नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांच्यात मागील महिन्यात पर्यटनाच्या मुद्द्यावरून वाकयुध्द झाले होते. मालदीव सरकारने भारताचे पंतप्रधान मोदींच्या विरोधात शेरेबाजी केली होती. त्यानंतर आता भारताकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करत नवा मास्टर स्ट्रोक खेळला आहे.
दरम्यान, भारताकडून मालदीवला तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, बटाटे, कांदे आणि अंडी निर्यात करण्यात येणार आहे. भारत-मालदीव यांच्यातील द्विराष्ट्रीय संबंधांना या निर्यातीमुळे चालना मिळणार आहे. आशिया खंडात चीनच्या वाढत्या प्रभावास लक्षात घेता या पार्श्वभूमीवर भारताचा निर्यातीचा निर्णय चीनची चिंता वाढवू शकतो.
एकंदरीत, मालदीवसोबतच्या वादावर पडदा टाकत भारत सरकारने निर्यातीवरील प्रतिबंध हटविण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे मालदीव सरकार हैराण झाले असून भारताच्या मैत्रीपूर्ण व्यवहारांस चालना दिली आहे. याआधी मालदीवने भारताविरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. आता भारताने मैत्रीचा हात पुढे करत मालदीव सरकारला मोठा दिलासा दिला आहे.
दुसरीकडे विस्तारवादी धोरण अवलंबिणारा चीन या निर्णयामुळे कोंडीत सापडला आहे. कारण भारताने आपल्या रणनीतीद्वारे मालदीवसाठी दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे चीनच्या मालदीवच्या आणखी जवळ जाण्याच्या रणनीतीला ब्रेक लागू शकतो. तुर्तास भारताने निर्यातीस परवानगी देत तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, बटाटे, कांदे आणि अंडी इ. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मालदीव करण्यात येणार आहे.
भारत-मालदीव वाद काय होता?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौऱ्यात येथील निसर्गरम्य आणि सुंदरतेचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. तसेच पर्यंटकांना लक्षद्वीप येण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर जगाचे लक्ष लक्षद्वीपकडे वेधले गेले. त्यानंतर गुगलवर लक्षद्वीप सर्च करण्याचे प्रमाण ३४०० टक्के वाढले. यामुळे गोष्टींमुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला होता. यामुळे जेरीस आलेल्या मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर संबंधित मंत्र्यांना निलंबितदेखील करण्यात आले होते.