लाल समुद्रातील सोमालियन समुद्रीचाच्यांमुळे जलमार्गाने होणार्या आंतरराष्ट्रीय व्यापार्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील आपली गस्तदेखील वाढवली असून, एका अपहरण केलेल्या जहाजावरुन क्रू मेंबर्सची सुटका करण्यातही यश आले. त्यानिमित्ताने नौदलासमोरील सागरी सुरक्षेची आव्हाने आणि उपाययोजना यांचा आढावा देणारा हा लेख...
इस्रायल-गाझा संघर्षांमध्ये इस्रायलच्या बाजूने काही देश आणि हमास-पॅलेस्टाईनच्या बाजूने काही देश व दहशतवादी संघटना मैदानात उतरलेल्या दिसतात. मात्र, येमेनस्थित हुथी दहशतवाद्यांकडून पूर्णपणे वेगळ्या दिशेने ’हमास’च्या समर्थनार्थ इस्रायलविरोधी हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांचा रोख लाल समुद्रातील इस्रायली आणि इस्रायल मित्र देशांच्या व्यापारी जहाजांकडे आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले होत आहेत, हा भारताकरिता मोठा धोका आहे. कारण, भारताचा २० टक्के व्यापार लाल समुद्रातून होतो.
सोमालियाजवळ एका जहाजाचे अपहरण करण्यात आले. जहाजाच्या एकूण २१ क्रू मेंबर्सपैकी १५ क्रू मेंबर्स भारतीय होते. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने, नंतर नौदलाच्या मार्कोस कमांडोनी क्रू मेंबर्सची सुटका केली.
मालवाहू व्यापारी जहाजे आणि तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न
हुथींकडून आलेल्या या क्षेपणास्त्रांपासून रक्षण करण्याकरिता अमेरिका, मित्रदेशांच्या नौदल नौका सक्षम आहेत. परंतु, व्यापारी जहाजे आणि मालवाहू टँकर्सना अशा प्रकारे सुसज्ज सुरक्षा व्यवस्था बाळगता येत नाही. लाल समुद्रातील वाहतूक महत्त्वाची आहे. कारण, भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र व एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंद महासागर, असा हा विस्तीर्ण आणि व्यापारीदृष्ट्या मोक्याचा जलमार्ग आहे.
ड्रोनशी मुकाबला करण्याची क्षमता व्यापारी जहाजांकडे नाही
काही नौदलांकडे हवेत आणि समुद्रात उडणार्या ड्रोनशी प्रभावीपणे मुकाबला करण्याची साधन व क्षमता आहे. हवाई ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे ‘जॅमिंग’ आणि ‘स्पूफिंग.’ परंतु, हे तंत्रज्ञान व्यापारी जहाजांसाठी उपलब्ध नाही. त्यांना हे तंत्रज्ञान देणे सोपे नाही. ‘जॅमिंग’मध्ये मैत्रिपूर्ण प्रणालीमध्ये हस्तक्षेप करण्याचीही क्षमता आहे. म्हणजे गैरवापर शक्य आहे.
‘स्पूफिंग’ हे ड्रोन नियंत्रण प्रणालीला गोंधळात टाकण्यासाठी उपयुक्त ठरते; पण हे जहाजाच्या नियंत्रणातही (Command control) अडथळा आणू शकते.
सशस्त्र ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी लेसर प्रणाली आणि उच्चशक्तीची मायक्रोवेव्ह शस्त्रे यांसारखी ‘निर्देशित ऊर्जा शस्त्रे’ प्रभावी आहेत; परंतु तंत्रज्ञाने महाग आहेत आणि बहुतेक जहाजाच्या आवाक्याबाहेर आहेत.
समुद्रात ड्रोनविरोधी युद्धाची रणनीती अजूनही पूर्ण विकसित झालेली नाही. हुथींनी निर्माण केलेल्या आव्हानावर मात करण्यासाठी, भारताला तांत्रिक सुधारणा आणि कारवाई करताना इतर देशांशी समन्वय जरुरी आहे. सशस्त्र ड्रोनचा सक्रियपणे सामना करण्यासाठी, भारतीय नौदलाला अधिक सक्षम भागीदारांच्या साथीने काम करणेही तितकेच आवश्यक आहे.
भारतासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये सामील होणे, हा एक व्यवहार्य पर्याय आहे. भारतीय नौदल हे अलीकडेच ३९ देशांतील नौदलांचा सहभाग असलेल्या (अमेरिकाप्रणित) ‘संयुक्त सागरी दला’चे म्हणजे ‘सीएमएफ’चे पूर्ण सदस्य बनले आहे.
या आघाडीचा एक भाग म्हणून भारतीय नौदलसुद्धा लाल समुद्राच्या दक्षिण टोकापासून एडनच्या आखातापर्यंत आणि त्यापलीकडे पसरलेल्या समुद्रमार्गापर्यंत ‘सेफ मॅरिटाईम कॉरिडोर’ तयार करण्यात मदत करू शकते.
भारताचा २० टक्के व्यापार लाल समुद्रातून
हुथी बंडखोरांना इराणचे शस्त्रास्त्रे आणि संपत्तीच्या माध्यमातून पाठबळ आहे. सौदी अरेबियाविरुद्ध येमेनमध्ये वरचष्मा गाजवण्यासाठी, इराणने हुथींना सुसज्ज केले. यातून हुथी शिरजोर बनले आणि आता ते इराणचेही ऐकत नाही. इस्रायल आणि अमेरिका या शत्रूंविरोधात इस्रायली भूमीशिवाय लाल समुद्र, अरेबियन समुद्र, हिंदी महासागरात चाललेले ड्रोन व क्षेपणास्त्राचे हल्ले जागतिक तसेच भारताच्या व्यापार-अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
भारताचा २० टक्के व्यापार या समुद्रातून होतो. इस्रायलमध्ये नोंदणी झालेल्या ‘एमव्ही केम प्लुटो’ या रसायनवाहू जहाजावर गुजरातपासून २०० नॉटिकल मैलांवर हल्ला करण्यात आला.
लाल समुद्रातून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूकही होते. आता तेलवाहू जहाज कंपन्यांनी आता वाहतुकीवर अतिरिक्त जोखीममूल्य आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन ते पाच टक्क्यांनी वाढले आहेत. भारताला रशियाकडून तेलपुरवठा होतो आणि रशिया-इराण संबंध सुरळीत असल्यामुळे या तेलवाहू जहाजांना अद्याप हुथींनी लक्ष्य केलेले नाही. धान्य, रसायने, खनिजे, खते घेऊन येणार्या जहाजांवर हल्ले होऊ शकतात.
लाल समुद्र टाळून दक्षिण आफ्रिकेच्या ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून, मालवाहतूक करणे खर्चिक आहे. कारण, किंमत ३० ते ४० टक्क्यांनी वाढते. येत्या काही दिवसांत त्यामुळेच ’हमास’पेक्षा हुथींची समस्या अधिक तापदायी ठरणार आहे.
भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या ’संकल्प मोहिमे’चा समारोप
भारतीय नौदलाच्या १०० दिवसांच्या ’संकल्प मोहिमे’चा दि. २३ मार्चला समारोप झाला. डिसेंबर २०२३च्या मध्यावर ही मोहीम सुरू झाली होती. या कालावधीत हिंद महासागरात सागरी सुरक्षेशी संबंधित १८ घटना भारतीय नौदलाने शीघ्र आणि प्रथम प्रतिसाद देत हाताळल्या.
इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने ’संकल्प’अंतर्गत आपल्या सागरी सुरक्षा मोहिमांची व्याप्ती लक्षणीयरित्या वाढवली होती.
१०० दिवसांत नौदलाची जहाजे, विमाने आणि विशेष दलांनी सागरी सुरक्षेसाठी आणि सागरी सेवेत कार्यरत समुदायाचे विविध अपारंपरिक धोक्यांपासून रक्षण केले.
या क्षेत्रातील धोक्यांविषयीच्या माहितीचे आकलन झाल्यानंतर एडनचे आखात आणि लगतचा प्रदेश, अरबी समुद्र तसेच सोमालियाचा पूर्व किनारा अशा तीन भागांत ही संकल्प मोहीम राबवण्यात आली.
भारतीय नौदलाने समुद्रात पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले, तर ४५० पेक्षा जास्त जहाज दिवस व २१ पेक्षा जास्त जहाजे तैनात केली गेली. सागरी क्षेत्रातील गस्त घालणार्या विमानाचे ९०० तास उड्डाण झाले.
भारतीय नौदलाने ११० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले (४५ भारतीय खलाशांसह), १५ लाख टन महत्त्वाच्या वस्तूंचे (उदा. खते, कच्चे तेल आणि उत्पादने) संरक्षण केले. जवळपास एक हजार सागरी कारवाया हाती घेण्यात आल्या. तीन हजार किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले आणि ४५० पेक्षा जास्त व्यापारी जहाजे सुरक्षित राखली.
भारतीय नौदलाच्या या प्रयत्नांमध्ये भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे, सागरी धोक्यांचा सामना करणे, नव्याने डोके वर काढणार्या चाचेगिरीला विरोध करणे, तसेच भारतीय सागरी क्षेत्रात अमली पदार्थांचा व्यापार लक्षणीयरित्या कमी करणे अशा कामगिरींचा समावेश आहे. मात्र, भारतीय नौदल सदैव तैनात करणे अत्यंत खर्चिक असेल.
भारताच्या मर्चंट नेव्हीची सुरक्षा
भारताच्या मर्चंट नेव्हीची संख्या मोठी आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्री मार्गाने होतो. वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात १ हजार, २०० हून अधिक बोटी सागरी व्यापारात गुंतलेल्या आहेत. त्यापैकी ८४० बोटी आपल्या समुद्रकिनार्यावर व्यापार करण्यात व्यस्त असतात आणि किनारपट्टीवरून ये-जा करतात. जवळपास ४०० बोटी या महासागरात इतर देशांशी व्यापारासाठी जात असतात. याचा अर्थ १ हजार, २०० हून अधिक भारतीय बोटी व्यापारासाठी किनारपट्टीवरून, विशेष आर्थिक परिक्षेत्रात जात असतात.
मात्र, भारताच्या व्यापारी जहाजांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे, ८० ते ८५ टक्के भारतीय व्यापार हा परदेशातील जहाजातून होतो. या जहाजांची सुरक्षासुद्धा आपल्या करता महत्त्वाची आहे.
याशिवाय अनेक भारतीय खलाशी इतर देशांच्या व्यापारी जहाजावर काम करतात. आताच्या आकडेवारीनुसार, जगातील सगळ्या मर्चंट नेव्हीमध्ये तैनात असलेल्या खलाशांच्या संख्येत १४ ते १६ टक्के योगदान हे भारतीय खलाशांचे आहे. भारतीय परदेशी बोटींवर करत असतील, तर त्यांचीसुद्धा सुरक्षा भारताकरिता महत्त्वाची आहे.
बोटीचे काही काळ रक्षण कसे करायचे?
भारतात येणार्या बोटींना योग्य सुरक्षा द्यावी लागेल. परदेशी बोटींवर काम करणार्यांना गुप्त माहिती कशी काढायची, बोटीचे काही काळ रक्षण कसे करायचे, याकरिता प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना मिळालेली माहिती कशी पुढे पाठवायची, हेदेखील शिकवावे लागेल. थोडक्यात, योग्य प्रशिक्षणानंतर सागरी सुरक्षा कमी खर्चाने मजबूत केली जाऊ शकते. भविष्यात कितीही बजेट वाढवले, तरीही संरक्षण करणार्या जहाजांची संख्या फ़ार वाढणार नाही. म्हणजे, आपल्याकडे असलेल्या सध्याच्या जहाजांचा योग्य वापर करूनच लाल समुद्र, अरेबियन समुद्र, किनारपट्टी आणि ‘एक्सटेंडेड इकोनॉमिक झोन’देखील सुरक्षित करावे लागेल.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन