देशाचे तुकडे करणे ही काँग्रेसची ओळख – पंतप्रधान नरेंद्र मोदी

05 Apr 2024 18:41:19
PM Modi's rally in Rajasthan's Churu

नवी दिल्ली: सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेसचे प्रारंभापासूनचे धोरण राहिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे शत्रूच्या घरात घुसून मारण्याचे सामर्थ्य भारताने दाखवून दिले आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजस्थान येथे केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील चुरू येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, लष्कराचा अपमान करणे, देशाचे तुकडे करणे ही काँग्रेसची ओळख आहे. जोपर्यंत इंडी आघाडीच्या पक्षांचे लोक सत्तेत होते, तोपर्यंत त्यांनी भारतीय सैनिकांचे हात बांधून ठेवले हो. शत्रू हल्ला करून निघून जायचे, मात्र प्रत्युत्तर देण्यापासून नेहमीच रोखण्यात आले. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये शत्रूला सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे घरात घुसून धडा शिकवण्याचे सामर्थ्य दाखवून दिले आहे. त्यामुळे सामर्थ्यशाली भारतासाठी राजस्थानची जनता ४०० पार चे ध्येय नक्कीच साध्य करणार, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

काँग्रेसने नेहमीच राष्ट्रहितापेक्षा लांगुलचालनास प्राधान्य दिल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. ते पुढे म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांनी न्यायालयात श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी अयोध्येत भव्य श्राराम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, संपूर्ण देश प्राणप्रतिष्ठा साजरा करत होता, पण काँग्रेस पक्षाने मात्र उघडपणे आमच्या श्रद्धेचा अपमान केला होता. काँग्रेस आणि इंडी आघाडीतील लोक फक्त स्वतःचे हित पाहत आहेत. त्यांना गरीब, दलित, शोषित आणि वंचितांच्या कल्याणाची किंवा त्यांच्या सन्मानाची चिंता नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही, त्यांचाही अपमान करण्याचे धोरण काँग्रेसचे असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

 
Powered By Sangraha 9.0