जैसलमेर - माळढोक प्रजनन केंद्रात हलला पाळणा; माळढोक संवर्धनासाठी आशेचा किरण

05 Apr 2024 19:59:23

gib

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राजस्थानमधील जैसलमेर येथील माळढोक (GIB) प्रजनन केंद्रामधून आनंदाची बातमी आली आहे. या केंद्रात २०२४ सालातील माळढोकच्या (GIB) पहिल्या पिल्लाचा जन्म झाला आहे. देशात अंदाजे १५० च्या संख्येत शिल्लक राहिलेल्या या नष्टप्राय पक्ष्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब आहे. (GIB)
 
देशातील नष्टप्राय प्रजातींच्या यादीत माळढोक या पक्ष्याच्या समावेश होतो. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) आणि राजस्थान वन विभाग विशेष प्रयत्न करत आहेत. यासाठी जैसलमेर जिल्ह्यातील सैम येथे माळढोक प्रजनन केंद्र उभारण्यात आले आहे. 'डब्लूआयआय'मधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या केंद्राचे कामकाज चालते. याठिकाणी पिजराबंद अधिवासात माळढोक पक्ष्यांची पैदास केली जाते. या केंद्रात शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी माळढोकच्या पिल्लाच्या जन्म झाला. प्रजनन केंद्रात २०२४ सालात जन्मास आलेले हे पहिलेच पिल्लू असल्याची माहिती 'डब्लूआयआय'ने दिली आहे.

प्रजनन केंद्रातील 'लिओ' (नर) आणि 'टोनी' (मादी) नामक माळढोकच्या जोडीने या पिल्लाला जन्म दिला आहे. दि.६ मार्च, २०२४ रोजी 'लिओ' आणि 'टोनी' यांचे केंद्रामध्ये मिलन झाले होते. त्यानंतर 'टोनी'ने ११ मार्च रोजी अंडी घातले. 'डब्लूआयआय'च्या तज्ज्ञांनी या अंड्याला ताब्यात घेऊन त्याच्या कृत्रिम उबवणीची प्रक्रिया सुरू केली. त्यातून २२ दिवसानंतर पिल्लाचा जन्म झाला आहे. नैसर्गिक अधिवासातील माळढोकची घट होणारी संख्या पाहता, हे प्रजनन केंद्र या प्रजातीसाठी आशेचा किरण आहे.
Powered By Sangraha 9.0