यशवंत नाट्यगृह १ मे पासून रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी होणार खुले

    04-Apr-2024
Total Views |

yashwant natya mandir
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर (Yashwant Natyagruha) बंद होते. मात्र, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीनंतर अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने पुढाकार घेत यशवंत नाट्य मंदिराची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला. गेले दोन महिने या वास्तुचे काम सुरु होते (Yashwant Natyagruha) आता ते पुर्ण होत आले असून शक्यतो १ मे २०२४ महाराष्ट्र दिनी यशवंत नाट्य मंदिर रसिक प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याची माहिती अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
राज्य सरकारने यशवंत नाट्य मंदिराच्या नूतनीकरणासाठी तब्बल १० कोटींचा निधी देऊ केला होता. प्रशांत दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत रिहर्सल हॉलचे ८५ टक्के काम तर मुख्य थिएटरचे काम ६० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाले आहे. १ मे महाराष्ट्र दिनी आमचा रसिक प्रेक्षकांसाठी यशवंत नाट्यगृह सुरु करण्याचा मानस नक्कीच आहे. नाट्यगृहात नवीन वातुनुकुलित यंत्रणा ही येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईबाहेरुन येणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर यशवंत नाट्यगृहाची नवी वास्तु प्रेक्षकांच्या स्वाधीन आम्ही करु, असे दामलेंनी म्हटले आहे.
 
त्यामुळे लवकरच मायबाप प्रेक्षक आणि कलाकारांमधील दुवा असलेले यशवंत नाट्यगृह नव्या झळाळीने कार्यरत होण्यास सज्ज होत आहे. अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र यशवंतराव नाट्यसंकुलाला न मिळाल्यामुळे गेले काही वर्ष हे नाट्य संकुल बंद होते. परंतु, हे ना हरकरत प्रमाणपत्र मिळाले असुन त्यात मुद केलेल्या तरतुदीपु्रमाणे दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.