काँग्रेसने अनेकवेळा भारताच्या अखंडतेचे तुकडे केले : डॉ. सुरेंद्र जैन

    04-Apr-2024
Total Views |

Surendra Jain

मुंबई : 
(VHP on Congress) "काँग्रेसने केवळ कच्छतीवु नाही तर भारताच्या अखंडतेमध्ये अनेकवेळा फूट पाडली आहे. आगामी निवडणुकीत भारतातील देशभक्त जनता अशा सरकारला निवडून देतील जे केवळ कच्छतीवु नाही तर भारत मातेची संपूर्ण हिसकावलेली भूमी मुक्त करून आपला राष्ट्रीय संकल्प पूर्ण करेल.", असे मत विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषदेने आपल्या सोशल मिडियावर डॉ. सुरेंद्र जैन यांचा एक व्हिडिओ गुरुवार, दि. ०४ एप्रिल रोजी पोस्ट केला. त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारांनी भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेकडे केलेल्या गंभीर दुर्लक्षाबद्दल विश्व हिंदू परिषदेने तत्कालीन सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

हे वाचलंत का? : मानवतेचा विकास म्हणजे माणसाचा विकास : डॉ. मोहनजी भागवत

सुरेंद्र जैन यावेळी म्हणाले की, कच्छतीवु हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. श्रीमती इंदिरा गांधींनी त्यास श्रीलंकेच्या श्रीलंकेच्या ताब्यात देण्याचा घेतलेला निर्णय मनमानी आणि घटनाबाह्य होता. हा भारताच्या सार्वभौमत्वाचा तसेच संसद, तामिळनाडू विधानसभा आणि तेथील मच्छिमारांचा विश्वासघात होता. २६ जून १९७४ रोजी इंदिरा गांधीच्या सरकारने अक्षरशः कच्छतीवु ही श्रीलंकेची वैयक्तिक मालमत्ता असल्याप्रमाणे दान केली. १९५६ ते १९७४ या काळात भारताच्या संसदेत श्रीलंकेतील घुसखोरी आणि भारतीय मच्छिमारांच्या शोकांतिकेबाबत अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले, परंतु तत्कालीन पंतप्रधानांनी भारताच्या सार्वभौमत्वाची आणि राष्ट्रीय अखंडतेची चिंता नसल्यासारखी गोलगोल उत्तरे दिली. तामिळनाडू विधानसभेने तर कच्छतीवु परत घेण्यासाठी अनेक ठराव मंजूर केले. पण काँग्रेस सरकारने याकडे लक्ष दिले नाही.

पुढे ते म्हणाले की, हा मनमानी निर्णयही घटनाबाह्य होता कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी प्रकरणात स्पष्टपणे सांगितले होते की, भारताला कोणत्याही करारानुसार इतर कोणत्याही प्रदेशाला कोणताही भाग द्यायचा असला तरी त्याची मंजुरी संसदेकडून घेणे आवश्यक आहे. या प्रकरणी संसदेला केवळ अंधारात ठेवले गेले नाही, तर चुकीचे चित्रणही करण्यात आले. तमिळ समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी तामिळनाडू विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याची गरजही सरकारला वाटली नाही.


काँग्रेस सरकारांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नेहमीच राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष केल्याचे विश्व हिंदू परिषदेला स्पष्ट दिसते. याबाबत बोलताना सुरेंद्रजी पुढे म्हणाले, भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत काँग्रेसची सरकारे नेहमीच असंवेदनशील राहिली आहेत. काश्मीरमधील ४२७३५ चौ. किमी क्षेत्र चीनने ताब्यात घेतले आणि ३४६३९ चौ. किमी क्षेत्र पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर काही दिवसांनी ताब्यात घेतले. ते मुक्त करण्यासाठी या सरकारांकडून कोणतेही गंभीर प्रयत्न केले गेले नाहीत. चीनच्या बेकायदेशीर ताब्याबद्दल नेहरूंनी तर म्हटले होते की, 'तिथे काहीही तयार होत नाही, त्यामुळे त्याची काळजी करू नये'. चीनने तिबेटवर बेकायदेशीरपणे कब्जा केला असतानाही नेहरूंनी राष्ट्रीय हितांबाबत अशीच असंवेदनशीलता दाखवली होती. विहिंपला विश्वास आहे की आगामी निवडणुकीत असे सरकार नक्कीच येईल जे केवळ कच्छतीवुच नाही तर हिसकावलेली जागा परत घेण्याचा राष्ट्रीय संकल्प देखील पूर्ण करू शकेल.

विश्व हिंदू परिषदेचे काँग्रेस नेतृत्वाला थेट सवाल
१) भारतीय सार्वभौमत्वाप्रती एवढी बेपर्वाई का झाली?
२) कच्छतीवुच्या समर्पणाने भारताचे कोणते हित साधले जात आहे?
३) संसदेची फसवणूक का झाली? वैधानिकदृष्ट्या संसदेची मंजुरी आवश्यक असतानाही या करारावर संसदेत आधी किंवा नंतर चर्चा का झाली नाही?
४) तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करण्याचे वारंवार आश्वासन देऊनही त्या सरकारने काय केले?