शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स ७४२२७ पार निफ्टी २२५१४ पतधोरण निकालाच्या पूर्वेसंध्येला बाजारात उसळी

बँक निर्देशांकात मोठी वाढ, तेल व गॅस समभागात सर्वाधिक नुकसान

    04-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज चांगली वाढ झाली आहे. सेन्सेक्स निफ्टी दोन्ही तेजीत दिसले आहेत. आज जागतिक दबावाखेरीज कंपन्यांनी चांगले प्रदर्शन करत बाजारात उसळी नोंदवली आहे. सेन्सेक्स ३५०.८१ अंकाने उसळत ७४२२७.६३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ८० अंशाने वाढत २२५१४.६५ पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय तिमाहीचे निकाल येण्याच्या पार्श्वभूमीवर आज बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक ३०७.०० अंशाने वाढत ५४१३९.५० पातळीवर पोहोचला आहे तर बँक निफ्टी निर्देशांक ४३६.५५ अंशाने वाढत ४८०६०.८० पातळीवर पोहोचला आहे. बीएससी मिडकॅप मध्ये आज ४५.२९ अंशाने घसरण झाली तर बीएससी स्मॉलकॅपमध्ये ०.५४ टक्क्याने म्हणजेच २४७.८९ अंशाने वाढ झाली आहे. एनएससीमध्ये मिडकॅप ०.०१ टक्क्याने म्हणजेच ७.१० अंशाने वाढत ४९७४३.८० पातळीवर पोहोचला. स्मॉलकॅप ४५.२९ अंशाने घसरण होत म्हणजेच ०.११ टक्क्याने कमी होत ४०६२५.४१ पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात देखील आज संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. परंतु ब्लू चीप समभागात वाढ झाल्याने आज बाजारात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात खाजगी बँक निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून त्यानंतर बँक,ऑटो समभागात वाढ झाली आहे.गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान तेल व गॅस समभागात झाले आहे.
 
एचडीएफसी बँक, महिंद्रा फायनान्स व इतर बँकेच्या संभाव्य निकालाबाबत गुंतवणूकदारांनी मोठा कौल दिल्याने आज बँक निर्देशांक व फायनांशियल सर्विसेस निर्देशांक व खाजगी बँक निर्देशांक आज मोठ्या दिमाखात वाढले आहेत. जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या वाढत्या किंमती पाहता त्याचा फटका आशियाई बाजारात देखील बसला आहे. आज तेल व गॅस समभागात त्यामुळे १.३७ टक्क्याने नुकसान झाले आहे.
 
बीएससीत एचडीएफसी बँक,टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेटंस, टीसीएस,मारूती सुझुकी, कोटक महिंद्रा, बजाज फायनान्स, एनटीपीसी, विप्रो, एम अँड एम, लार्सन,इन्फोसिस या समभागात वाढ झाली आहे. तर एसबीआय, जेएसडब्लू स्टील, पॉवर ग्रीड, रिलायन्स, बजाज फायनान्स, नेसले,सन फार्मा, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक,एचयुएल या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएससीमध्ये एचडीएफसी बँक,टायटन,आयशर मोटर्स, एशियन पेटंस, डिवीज,अपोलो हॉस्पिटल,एनटीपीसी, विप्रो,मारूती, कोल इंडिया, बजाज फायनान्स, एम अँड एम, बजाज ऑटो, इन्फी, टाटा मोटर्स या समभागात फायदा झाला आहे. ओएनजीसी, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्टस, बिपीसीएल, भारती एअरटेल, एसबीआय, ग्रासीम,पॉवर ग्रीड, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, अदानी एंटरप्राईज, रिलायन्स,आयटीसी, ब्रिटानिया, एचडीएफसी लाईफ, नेसले, टाटा स्टील, सनफार्मा, एक्सिस बँक, एचयुएल या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान करावे लागले आहे.
 
डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपया ८३.४४ रुपयांवर बंद झाला आहे.आज रूपया ४ पैशाने घसरला आहे. उद्या रिझर्व्ह बँकेचे पतधोरण घोषित होणार आहे. उद्या आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास रेपो दर घोषित करतील. तज्ञांच्या मते सलग सातव्यांदा रेपो रेट स्थिर राहण्याची शक्यता आहे.आज दिवसभरात समभागात मोठे चढ उतार पहायला मिळाले अखेर बँक निर्देशांकात वाढ झाल्याने निर्दशांक मोठ्या फरकाने वरच्या पातळीवर स्थिर झाले आहेत. काल सेन्सेक्स ७४४१३.८२ तुलनेत आज ७३८७६.८२ पातळीवर उघडला गेला. आज सेन्सेक्सने सर्वाधिक पातळी ७४४१३.८२ गाठली होती.
 
निफ्टीने सकाळच्या सत्रात २२५९२.१० पातळीला उघडल्यानंतर २२६१९.१९ पातळीवर निफ्टी पोहोचला होता.आज एकूण बीएससीचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन)३९८.४ लाख कोटी व एनएससीचे बाजारी भांडवल ३९७.४ कोटी राहिले आहे.
 
बीएससीत एकूण ३९४७ समभागांचे ट्रेडिंग (व्यापार) झाले ज्यामध्ये २४५१ समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे तर १३९७ समभागांचे मूल्यांकन घसरले आहे २१४ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले आहे तर ७ समभागांचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे. ५ कंपन्यांचे समभाग आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून २ कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
 
एनएससीमध्ये २७०७ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६७१ समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली असून ३६ कंपन्यांच्या समभागांचे आज नुकसान झाले आहे. त्यातील १४९ समभागांचे मूल्यांकन आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून ६ कंपन्यांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील लोअर सर्किटवर राहिले. जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली असताना अनपेक्षितपणे क्रूड साठ्यात वाढ झाल्याने संध्याकाळी एमसीएक्सवर क्रूड तेलाच्या निर्देशांकात ३७ अंशाने घट झाली असून प्रति बॅरेल किंमत ७१२५ रूपयावर पोहोचली होती. काल क्रूड तेलाच्या भावात पाच महिन्यातील सर्वाधिक वाढ झाली होती.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी ०.३६ % ने २२५१४ वर सकारात्मक नोटवर बंद झाला, तर सेन्सेक्स ०.४७ % ने ७४२२७ वर बंद झाला.निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक हे क्षेत्र होते ज्यांनी आज अनुक्रमे १.०८ % आणि ०.९२ % ने वाढ केली आहे.
 
उद्या आरबीआयच्या आगामी चलनविषयक धोरण विधानावर भर असल्याने गुंतवणूकदारांनी आज सावध धोरण अवलंबले. चलनवाढीच्या व्यापक चिंतेमुळे, अपेक्षा रेपो दरातील अपेक्षित स्थितीकडे झुकतात. बँका चांगल्या Q4 कमाईची अपेक्षा करतात, ज्यामुळे बँकिंग क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला.निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा आणि टायटन कंपनी हे सर्वाधिक लाभधारक आहेत, तर ओएनजीसी, श्रीराम फायनान्स,अदानी पोर्ट्स, बीपीसीएल आणि भारती एअरटेल यांना तोटा झाला आहे.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलीगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले,
'बाजारात आणखी एका सत्रासाठी अस्थिर व्यवहार झाले आणि जवळपास अर्धा टक्का वाढ झाली.सुरुवातीच्या वाढीनंतर, निफ्टी सुरुवातीच्या तासांमध्ये झपाट्याने खाली घसरला, परंतु हेवीवेट्समधील ताकद, विशेषत: बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख, निर्देशांकाला तोटा भरून काढण्यास आणि इंच उंचावण्यास मदत झाली.
 
अखेरीस, निफ्टी २२५१४.६५ स्तरावर (०.४ % वर) स्थिरावला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल कायम राहिला ज्यामध्ये एफएमसीजी आणि ऊर्जा लाल रंगात बंद झाले. व्यापक आघाडीवर तेजी कायम राहिली ज्यामध्ये स्मॉलकॅप जवळपास अर्धा टक्का वाढला.'
 
आम्ही प्रचलित टोन सुरू ठेवण्याची अपेक्षा करतो तथापि, प्रगतीचा वेग मुख्यत्वे बँकिंग आणि आयटी प्रमुखांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. सहभागींनी "बाय ऑन डिप्स" पध्दत सुरू ठेवली पाहिजे आणि स्टॉक निवडीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.'
 
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,"मजबूत पुनरुत्थानानंतर,बँक निफ्टीने ४८००० ची लक्षणीय प्रतिरोधक पातळी ओलांडली, कॉल साइडवरील पीक ओपन इंटरेस्टच्या बरोबरीने पातळी ओलांडली आहे. निर्देशांकासाठी तात्काळ समर्थन आता ४७५०० वर सरकले आहे, जिथे सर्वाधिक लक्ष खुल्या व्याजावर केंद्रित आहे. आरबीआयच्या च्या धोरणाच्या घोषणेनंतर, ४८००० पातळीच्या वर टिकून राहणे हे ४९०००/५०००० स्तरांकडे अपट्रेंड सुरू ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे."