संजय निरुपम यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी! पुढचं पाऊल काय?

    04-Apr-2024
Total Views |

Sanjay Nirupam 
 
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेसाठी उबाठा गटाचे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, संजय निरुपम यांचा याला विरोध होता. यातूनच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मात्र, त्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 
 
संजय निरुपम यांनी बुधवारी रात्री पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या ठाकरे गटाने परस्पर अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली. ते खिचडीचोर आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब खिचडीचोर आहे. त्यामुळे ज्यांची ईडीची चौकशी सुरु आहे मी त्यांचा प्रचार करणार नाही. काँग्रेस पक्षाच्या लोकांना जागावाटपात जाणूबुजून माझी जागा गमावली आणि एका भ्रष्टाचाऱ्याला दिली. मी त्याला विरोध केला."
 
हे वाचलंत का? -  अमरावतीत वंचितची माघार! 'या' उमेदवाराला देणार पाठिंबा
 
मी काल (बुधवारी) रात्रीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर तत्काळ माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा घटनाक्रम त्यांनी सांगितला. संजय निरुपम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस पक्ष हा संपलेला पक्ष असून मी आता पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये काहीही दम राहिलेला नसून आघाडीतील तिन्ही पक्ष काहीही करु शकत नाही. काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी मी गेल्या कित्येक महिन्यांपासून संघर्ष करत आहे. ज्यांचा हातात पक्ष दिला आहे त्या सगळ्यांनी कोणाशी हातमिळवणी केली हे कुणालाही माहिती नाही. लोकांना कसं तोडायचं हेच त्यांचं कारस्थान आहे. मी आता काँग्रेस पक्ष सोडलेला असून नवरात्रीदरम्यान पुढे काय करायचं हे ठरवणार आहे," असेही ते म्हणाले.