“तू जिथे असशील…”, गार्गीची वडिल निळू फुलेंसाठी खास पोस्ट

    04-Apr-2024
Total Views |
गार्गी फुले-थत्ते यांनी वडील निळू फुलेंसाठी जन्मदिनाच्या निमित्ताने केलेली खास पोस्ट
 

nilu phule  
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकार म्हणजे अभिनेते निळू फुले (Nilu Phule). दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या निळकंठ कृष्णाजी फुले अर्थात निळू फुले यांची आज ४ एप्रिल जयंती. निळू फुलेंनी साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या मनात इतका खोलवर रुतत होता की त्यांच्याविषयी लोकांना तिटकारा येत होता. अर्थात ही निळू फुलेंना (Nilu Phule) त्यांच्या कामाची मिळालेली पोचपावतीच होती. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांची लेक गार्गी फुले हिने एक खास पोस्ट केली आहे.
 
गार्गी-फुले थत्ते हिनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरु केली. आपल्या वडिलांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणारी एक भावनिक पोस्ट करत लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. तू जिथे असशील तिथे खूप खूप प्रेम…”.
 

gargi post  
 
निळू फुले यांचा जन्म पुण्याचा. वडिल पुण्यात भाजी आणि लोखंड विकून मिळणाऱ्या पैशांतून घर चालवत होते. निळू फुलेंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. इतकेच नाही तर उद्यानविषयक पदवी देखील त्यांना मिळाली होती. त्यांनी पुणे येथील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या उद्यानात माळी म्हणून काम केले. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याने प्रभावित होत त्यांनी उद्यान हे नाटकही लिहिले. यानंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला आणि या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर पु. ल. देशपांडेंच्या ‘पुढारी पाहिजे’ या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारली पण निळू फुलेंना अभिनेता म्हणून ओळख अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे मिळाली. यानंतर १९६८ मध्ये त्यांनी एक गाव बारा भानगडी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर सखाराम बाइंडर नाटक, बिन बियांचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या.
 
तसेच, निळू फुले ४० वर्ष रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर कार्यरत होते. या काळात त्यांनी सामना, सिंहासन, शापित, पुढचं पाऊल, सोंगाड्या, पिंजरा, जैत रे जैत, पटली रे पटली, एक होता विदूषक अशा अनेक मराठी तर सारांश, मशाल, प्रेम प्रतिज्ञा, कुली या हिंदी चित्रपटांतही कामं केली. याशिवाय सूर्यास्त, जंगली कबुतर, बेबी, रण दोघांचे ही त्यांची काही प्रमुख नाटकेही लोकप्रिय ठरली. २००९ साली प्रदर्शित झालेला गोष्ट छोटी डोंगराएवढीहा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला होता.