नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा!

    04-Apr-2024
Total Views |

Navneet Rana 
 
मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
 
नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली होती, अशी याचिका २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते रद्द केले होते. त्यानंतर राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
 
दुसरीकडे, यावेळी नवनीत राणा अमरावती लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले असून गुरुवारी त्या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमरावतीत असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "जात वैधता प्रमाणपत्रावर जे लोकं बोट उचलत होते आणि नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर राजकारण करत होते त्यांना सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलेले आहे."