अमरावतीत वंचितची माघार! 'या' उमेदवाराला देणार पाठिंबा

    04-Apr-2024
Total Views |

PRakash Ambedkar
 
अमरावती : वंचित बहुजन आघाडीने अमरावती लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पत्र लिहिले असून उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची विनंती केली आहे.
 
आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करताना आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. परंतू, वंचितने तसे काहीही जाहीर न केल्याने आनंदराज आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान, आता वंचितने त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यांनी अर्ज मागे घेऊ नये असे म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरे पाकिस्तानात हनुमान चालीसा म्हणायची का? : फडणवीस
 
वंचितने आपल्या पत्रात लिहिले की, "अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आपल्याला पक्षाकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये, अशी स्पष्ट सूचना आम्ही दिली व त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यात आलेला नाही."
 
"आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असाल, तर आधी ठरल्याप्रमाणे आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा राहील. त्यामुळे आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी," अशी विनंती या पत्रातून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.