नवी दिल्ली : दहशतवादी यासिन मलिकच्या सुटकेसाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स नवी दिल्लीत लागले आहेत. या पोस्टर्सवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत दहशतवादी यासिन मलिकचा फोटो लावण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हे पोस्टर्स हटवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ दिल्लीतील मंडी हाऊस चौकाजवळ हे पोस्टर्स समोर आले. यामध्ये २५ मे रोजी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दहशतवादी यासिन मलिकसोबतचा फोटो आहे.
या पोस्टरवर लिहिले आहे की, “यासिन मलिकच्या सुटकेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मत द्या.” त्याच्या खाली व्हॉइस फॉर डेमोक्रसी असे नाव लिहिले आहे. या भागातील खांबांवर हे पोस्टर्स लावण्यात आले होते. पोस्टर्सची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी त्यांना येथून हटवले.
यासीन मलिक यांना काँग्रेसला मत देण्यासाठी पोस्टर कोणी लावले हे अद्याप कळलेले नाही. या संदर्भात काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही. दिल्ली पोलिसांनीही पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली नाही. याबाबत सोशल मीडियावर काँग्रेसवर टीका केली जात आहे.
यासीन मलिक हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी असून तो सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर विंग कमांडर अधिकारी रवी खन्ना यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोप आहे. त्याच्यावर टेरर फंडिंगचा खटलाही सुरू आहे. यासीन मलिक जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट नावाची संघटना चालवत होता ज्यावर केंद्र सरकारने बंदी घातली होती. कारवाई टाळण्यासाठी यासीन मलिकने १९९० च्या दशकात दहशतवाद केल्यानंतर, अहिंसेचा मार्ग स्विकारल्याचे नाटक केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत दहशतवादी यासिन मलिकचा हा फोटो २००६ मधील आहेत. २००६ मध्ये यासिन मलिकला काँग्रेस सरकारने पंतप्रधान निवासस्थानी बोलावले होते. यावेळी त्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन करताचा फोटो पोस्टरवर लावण्यात आला आहे.