आता ‘व्होट जिहाद’चा नारा!

    30-Apr-2024
Total Views |
 
maria alam
 
मुस्लीम समाजाला कोणतीही गोष्ट करण्यास भाग पाडण्यासाठी तिला धार्मिक मुलामा देण्याची गरज भासते. ज्यात त्यात धर्म आणला की मुस्लीम समाज त्याचे निमूटपणे पालन करतो, हे आतापर्यंत दिसून आले आहे. सर्व सरकारी सवलतींचा लाभ घेण्यात पुढे असलेला हा समाज आजही भारतीय समाजाशी एकरूप होण्यास तयार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. राम मंदिराचे श्रेय घेऊन मते मागण्यावर आक्षेप घेतला जात असेल, तर ‘जिहाद’सारख्या धार्मिक संकल्पनांच्या वापरावरही आक्षेप घेतला पाहिजे.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम यांनी मुस्लिमांना ‘व्होट जिहाद’ करण्याचे नुकतेच आवाहन केले. आता याचा नेमका अर्थ काय, तो त्यांनाच ठाऊक असला, तरी ‘व्होट जिहाद’ करून आपण या संघी सरकारला (मोदी सरकार) सत्तेवरून हटवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ मुस्लिमांनी आपली एकगठ्ठा मते काँग्रेसला द्यावीत, असा होतो. उत्तर प्रदेशात काँग्रेस व समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाल्याने जेथे ‘एनडीए’चा उमेदवार असेल, त्याच्या विरोधात मुस्लीम मतदारांनी ‘इंडी’ आघाडीच्या उमेदवाराला मते द्यावीत, असे मारिया यांचे म्हणणे. हे आवाहन त्या साध्या शब्दांतही करू शकल्या असत्या, पण त्यांनी त्यासाठी हेतूत: ‘व्होट जिहाद’ असा शब्द वापरला. हा शब्द प्रथमच वापरला गेला असला, तरी त्यातून मुस्लीम समाजाची मानसिकता स्पष्ट होते.
 
मुस्लिमांना कोणतीही गोष्ट करण्यास भाग पाडण्यासाठी तिला धार्मिक मुलामा देण्याची गरज भासते, हे लक्षात घेण्याची गरज आहे. पूर्वी कोणत्याही निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मते देण्याचा फतवा इमाम बुखारी काढत असत. त्यावरून टीका झाल्यावर आणि त्याचा विपरित परिणाम हिंदू मतांचे धु्रवीकरण होण्यात होतो, हे लक्षात आल्यावर असे फतवे काढणे बंद करण्यात आले. पण, आता ‘व्होट जिहाद’च्या उल्लेखाने मुस्लीम समाजाने पुन्हा एकदा निवडणुकीत धार्मिकतेला प्रवेश दिला आहे. एकीकडे भाजपने प्रचारात राम मंदिर बांधल्याचा उल्लेख केल्यास काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष आक्षेप घेतात. मग ‘जिहाद’सारख्या धार्मिक संकल्पनेच्या उच्चारावरही बंदीच घातली गेली पाहिजे.
 
गेली काही वर्षे भारतात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडताना दिसत आहेत. हिंदू तरुणींना आपल्या मोहपाशात गुंतवून त्यांच्याशी लग्न करण्याचा आणि लग्नानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या घटनांना ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. हिंदू मुलींना बाटविणे आणि त्यांच्यापासून मुस्लीम संततीची पैदास करणे, हा ‘लव्ह जिहाद’चा प्रमुख उद्देश आहे. सुमारे आठ-दहा दिवसांपूर्वी कर्नाटकात काँग्रेसच्या एका हिंदू नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयामध्येच एका मुस्लीम युवकाने चाकूचे घाव घालून हत्या केली होती. हे प्रकरण केवळ एकतर्फी प्रेमाचे नसून तोही ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार आहे, ही गोष्ट आता उघड झाली आहे. ही घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रातही अशाच प्रकारे काही हिंदू तरुणींची हत्या करण्यात आल्याच्या घटना गेल्या चार दिवसांत उघडकीस आल्या आहेत. गतवर्षी झालेल्या श्रद्धा वालकरच्या हत्येने सार्‍या देशाला धक्का बसला होता. त्यानंतरही या घटनांमध्ये खंड पडलेला नाही. ‘लव्ह जिहाद’चे भयावह स्वरूप उघड करणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपटही खूप गाजला होता. बहुतेक सर्व ‘लव्ह जिहाद’च्या घटनांचा अंत संबंधित मुलीच्या हत्येत होतो, हेही दिसून आले आहे. मुस्लीम समाजातील एकही नेता किंवा संघटनेने त्याविरोधात आवाज उठविलेला नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
 
त्याचप्रमाणे अनेक सरकारी जागांवर कब्जा करण्याच्या मुस्लीम संघटनांचा ‘लॅण्ड जिहाद’चा प्रश्नही चर्चेत आहे. मोकळ्या जमिनीवर अचानक हिरवे कापड आच्छादलेले एक थडगे उभे राहात असे आणि काही दिवसांनी त्याच्या भोवती पक्के बांधकाम केले जाई. ही कोणत्या तरी पीराची समाधी आहे, असे सांगितले जात असे. या घटनांच्या धार्मिक स्वरूपामुळे ते बांधकाम पाडण्यास पोलीस किंवा सरकार हयगय करीत असे आणि संबंधित जागा मुस्लीम संघटनेच्या किंवा वक्फ बोर्डाच्या मालकीची होत असे. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मध्यंतरी अशा प्रकारांविरोधात कठोर भूमिका घेऊन अनेक ठिकाणची ही कथित थडगी पाडून, त्या जमिनी पुन्हा मोकळ्या केल्या होत्या. महाराष्ट्रात ‘लॅण्ड जिहाद’च्या समस्येकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहात नाही, हे दुर्दैवी. याचे कारण काही गड-किल्ल्यांवरही गेल्या काही वर्षांत अशी थडगी उभी राहिली आहेत. ती थडगी नवी आहेत, हे स्पष्टपणे दिसते. तरीही त्यावर राज्य सरकारने कारवाई केलेली नाही.
 
मोदी सरकारने अतिशय प्रभावीपणे सुरू केलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांचे सर्वात मोठा लाभार्थी हा मुस्लीम समाज आहे. सर्व सरकारी सवलतींचा लाभ घेण्यात हा समाज नेहमीच अग्रेसर असतो. पण, ज्या समाजात आणि देशात आपण राहतो आणि सरकारच्या योजनांचे लाभ घेतो, त्या देशाचे आपण काही देणे लागतो, ही भावना मुस्लीम समाजात अभावानेच आढळून येते. आपल्या हक्कांसाठी अतिशय जागरूक असलेला हा समाज कर्तव्यपालनात मात्र नेहमीच उदासीन असतो. सरकारला करांद्वारे मिळणार्‍या महसुलात या समाजाचे योगदान जवळपास शून्य आहे. हिंदूंवर दोन अपत्यांची सक्ती करण्यात येते आणि अधिक मुले असलेल्यांचे प्रसंगी सरकारी नोकरीतील काही लाभही हिरावले जातात. पण, हा न्याय या समाजाला लागू नाही, असे दिसते. हिंदुत्वाचा आरोप करण्यात आलेल्या मोदी सरकारनेही या समाजाला भरपूर लाभ दिले आहेत. इतके असूनही या समाजाने मोदी सरकारला कधी आपले मानले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किंवा त्यांच्या सरकारवर जाहीरपणे (आणि जहरी) टीका करण्यात हाच समाज आणि त्याचे नेते आघाडीवर असतात. पण, मोदी सरकारकडून सरकारी योजनांचे लाभ स्वीकारताना त्यांच्या मनात कधी अपराधीपणाची भावना नसते.
 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक मुस्लीम नेत्यांच्या जागा धोक्यात आल्या असून, त्यांनी आपला विजय निश्चित करण्यासाठी आता हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घातलेले दिसते. हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांना मिळणार्‍या पाठिंब्यामुळे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हादरले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपला प्रचार ‘मुस्लिमांचा नेता’ म्हणून सुरू केला आहे. सलमान खुर्शीद यांच्या पुतणीलाही हाच धोका जाणविला असणार. त्यामुळेच त्यांनी आता ठेवणीतील जिहादचे शस्त्र उपसले आहे. उत्तर प्रदेशातील सर्व ८० जागांवर विजय मिळविण्याचा भाजपने, त्यातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्धार केला आहे. त्यांच्या कामामुळे आणि मोदी यांच्या करिष्म्यामुळे उत्तर प्रदेशातील ‘इंडी’ आघाडीच्या अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता त्यांनी जिंकण्यासाटी अखेरचा उपाय म्हणून धार्मिक आधारावर मते मागण्यास सुरुवात केल्याचे दिसते.