मदरशात शिकणाऱ्या मुलांना अनाथ दाखवून परदेशातून मिळवत होते पैसे; ५ मौलवींना पोलिसांनी केली अटक

    30-Apr-2024
Total Views |
 Madarsa
 
लखनौ : मानवी तस्करीच्या भीतीने शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ उत्तर प्रदेशातील अयोध्येत बसची झडती घेण्यात आली. त्यानंतर या बसमध्ये ९३ अल्पवयीन मुले आढळून आली, ज्यांचे वय ६ ते १४ वर्षे दरम्यान होते. याच बसमधील पाच मौलवींनाही पकडण्यात आले. सर्व मुले बिहारमधील अररिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शिकवण्याच्या नावाखाली सहारनपूर जिल्ह्यातील एका मदरशात नेले जात होते. या मदरशांची नोंदणीही करण्यात आली नव्हती.
 
मौलवींनी मुलांना अनाथ दाखवून परदेशातून निधी घेतल्याचा आरोप आहे. मुलांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे सांगितले. प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी पोलिसांनी अयोध्येच्या देवकालीजवळ डबल डेकर बस थांबवली. बसमध्ये जवळपास १०० लोक होते. त्यात ९३ अल्पवयीन मुले होती जी खूप थकलेली आणि अस्वस्थ दिसत होती. ही बस बिहारमधील अररिया येथून येत होती.
 
 
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बसमध्ये प्रवास करणाऱ्या ५ मौलवींनी सहारनपूरला जात असल्याचे सांगितले. येथे, देवबंद परिसरात असलेल्या दोन मदरशांचा उल्लेख करण्यात आला, ज्यांची नावे मदारुल उलूम रफिकिया आणि दारे अरकम अशी आहेत. या मदरशात सर्व मुलांना प्रवेश दिला जाणार होता. पोलिसांनी तपास केला असता दोन्ही मदरशांची नोंदणीही नसल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय मुलांच्या पालकांकडून पैसे घेऊनही हे मौलवी मुलांना अनाथ दाखवून परदेशातून निधी मिळवत होते.
 
पोलिसांनी मुलांना लखनौ येथील सरकारी बालगृहात ठेवले आणि त्यांच्या पालकांनाही माहिती दिली. राज्य बाल संरक्षण आयोगाचे पथक रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ येथे पोहोचले. त्यांनी मुलांची विचारपूस केली असता त्यांनी मदरशात झालेल्या अत्याचाराविषयी उघडपणे सांगितले. मदरशात त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे मुलांनी सांगितले. त्यांना स्वच्छतागृहे स्वच्छ करायला लावली आणि कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली.
 
मुले आजारी पडली तरी घरून पैसे मिळाल्यावरच त्यांना औषध दिले जायचे. सहारनपूरच्या मदरशात अनेक मुले आधीच राहिली आहेत. येथील दरवाजे रात्री बंद असायचे. गेट उघडण्यास सांगितले असता गेटवर तैनात असलेल्या रक्षकांनी मुलांना बेदम मारहाण केली.