"भाजपला हरवण्यासाठी 'व्होट जिहाद' करा" - काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

30 Apr 2024 11:34:13
Salman Khurshid
लखनौ : काँग्रेस नेते आणि भारताचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांची भाची मारिया आलम उमर यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांना 'व्होट जिहाद' करण्याचे आवाहन केले आहे. फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातून सपा-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले आहे. मारिया यांच्या वक्तव्यावेळी काँग्रेस नेते सलमान खुर्शीदही मंचावर उपस्थित होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
फारुखाबाद लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत मारिया आलम उमर म्हणाल्या, “आम्ही अजूनही एक नाही झालो तर समजून घ्या की, जे सरकार इथून आम्हाला संपवू पाहत आहे, त्या सरकारला यशस्वी करण्यासाठी तुम्ही काम कराल. म्हणूनच आपण हुशारीने आणि शांतपणे एकत्र येऊन मतांसाठी जिहाद केला पाहिजे, कारण आपण फक्त मतांसाठी जिहाद करू शकतो.
 
हे वाचलंत का? -  पाकिस्तानी हेर 'मोहम्मद सकलेन'ला गुजरात एटीएसने ठोकल्या बेड्या
 
मारिया आलम उमर म्हणाल्या की, काही मुस्लिम भाजप उमेदवार मुकेश राजपूत यांना पाठिंबा देत आहेत याची मला लाज वाटते. मारिया आलमच्या या वक्तव्यावेळी सलमान खुर्शीद आणि त्याची पत्नी लुईस खुर्शीदही मंचावर उपस्थित होते. सपा-काँग्रेसची एकजूट दाखवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या ठिकाणी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती ती जागा अल्पसंख्याकबहुल क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले.
 
सलमान खुर्शीद यांनी या बैठकीत सांगितले की, त्यांना अलीगढ, कानपूर आणि इतर भागातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली होती, परंतु फारुखाबादमुळे त्यांनी ती नाकारली. सलमान खुर्शीद म्हणाले की, भाजपसाठी वाईट दिवस येत आहेत. विशेष म्हणजे सलमान खुर्शीद हे फारुखाबादमधून खासदार होते पण इंडी आघाडीच्या जागावाटपात ही जागा सपाकडे गेली. त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती पण काँग्रेसला दिलेल्या जागांमध्ये फारुखाबादचा समावेश नव्हता. याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0