‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’, निलेश साबळेंच्या हाती कलर्सचा झेंडा

    03-Apr-2024
Total Views |
निलेश साबळे , भाऊ कदम दिसणार आता कलर्सवर, नव्या विनोदी शोची घोषणा
 
 nilesh sabale
 
मुंबई : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. झी मराठी वाहिनी, चला हवा येऊ द्या आणि डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) हे समीकरण प्रेक्षकांसाठी अतुट होते. परंतु, काही कारणास्तव एक एक करत या मालिकेतील कलाकार बाहेर पडत गेले आणि शेवटी ‘चला हवा येऊ द्या’चा कर्ताधर्ता निलेश साबळे (Nilesh Sabale) देखील कार्यक्रमातून वेगळा झाले. यानंतर पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता; आता याचे उत्तर समोर आले असून निलेश साबळे यांनी कलर्स मराठी वाहिनीचा झेंडा हाती घेतला असून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा विनोदी कार्यक्रम ते घेऊत येत आहेत.
 
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच कलर्स मराठी वाहिनीने आगामी नव्या मालिकांची घोषणा केली होती. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेंड केदार शिंदे यांनी इंद्रायणी, सुख कळले या मालिका भेटीला विनोदाचा खजिना घेऊत येत आहेत. डॅा. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदवीर ‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम घेऊन येत असून या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे सांभळणार आहेत. तसेच, या कार्यक्रमात सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत.
 
याशिवाय विनोदाचे अचूक टायमिंग असणारे भरत जाधव आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल सेलिब्रिटी पाहूण म्हणून कार्यक्रमाला दाद देणार आहेत. आता मात्र, उत्सुकता याची आहे की ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांव्यतिरिक्त हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करणार आणि काय वेगळेपणा सिद्ध करणार. ‘'हसताय ना ? हसायलाच पाहिजे!' हा कार्यक्रम कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.