जीवासवे जन्मे मृत्यू

वैदिक षोडश संस्कार-१६ अंतिम संस्कार (भाग-१)

    03-Apr-2024
Total Views |
Death

 
मृत्यू कोणालाही सोडत नाही. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, वेळ-काळ कोणताही असो, या जगात येणार्‍याला एके दिवशी हे जग सोडावयाचे आहे. जावयाचे तरी आहेच, पण ते रडत रडत नव्हे, तर आनंदाने जसे आमचे येणे आनंदाचे, तसेच जाणेदेखील आनंदाचे व्हावयास हवे. आम्ही जन्माचे स्वागत केले, मृत्यूचे स्वागत का म्हणून करु नये. याचाच अर्थ असा की, आम्हाला मृत्यूचे रहस्य समजले नाही. खरे तर मृत्यू हा जीवात्म्याचा नव्हे, तो तर शरीराचा आहे. कारण, आत्मा हा अजर व अमर आहे, तर देह नाशवंत आहे.

मृत्यूरीशे द्विपदां मृत्यूरीशे चतुष्पदाम्।
तस्मात् त्वां मृत्योर्गोपतेरुद्
भरामि स मा बिभे:॥
(अथर्ववेद-८/२/२३)
अन्वयार्थ
 
(मृत्यू:) मृत्यू हा (द्वि-पदाम्) दोन पाय असणार्‍या जीवांवर (ईशे) शासन करतो. तसेच (मृत्यू:) मृत्यू हा (चतुष्पदाम्) चार पाय असणार्‍या प्राण्यांवरही (ईशे) शासन करतो. म्हणून हे जीवात्म्या, (त्वाम्) तुला (तस्मात्) त्या (गो-पते: मृत्यो:) त्रिभुवनांच्या अधिपती असलेल्या, भौतिक जगाच्या शासक असलेल्या मृत्यूपासून मी (उत् भरामि) वर काढतो, दूर सारतो. (स:) तो=तू हा असा त्यापासून (माबिभे:) घाबरू नकोस, भिऊ नकोस !

विवेचन

सारे जग हे परिवर्तनशील आहे. आत्मा व परमात्मा या दोन शक्ती सोडून या संपूर्ण ब्रह्मांडात एखादी अशी कोणतीही वस्तू नाही की जी शाश्वत टिकून राहणारी आहे. प्रत्येकाचा नाश अटळ आहे. आम्हांस वाटते की, ही दुनिया कायम टिकून राहणारी आहे म्हणून यातील सर्व भोगपदार्थांचा आम्ही चिरंतन उपभोग घेत राहावे. पण, हे सर्व काही दिवास्वप्न होय. महाभारतात महर्षी व्यास म्हणतात,

सर्वे क्षयान्ता: निचया:,
पतनान्ता: समुच्छृया:।
संयोगा: विप्रयोगान्ता: मरणान्तं हि जीवितम्॥


या संसारात जेवढे काही संग्रह (वस्तूंचे ढीग) आहेत, त्या सर्वांचा क्षय होणार आहे. जितके प्रगत व उन्नत (उंचवटे) आहेत, ते पतनशील आहेत. ज्यांचे संयोग आहेत, त्यांचा शेवटी वियोगदेखील आहे व जेवढे जीवन धारण करणारे जीवात्मे आहेत, त्यांचा शेवटी मृत्यूदेखील निश्चित आहे.
 

योगेश्वर श्रीकृष्णांनीदेखील गीतेत (२/२७) म्हटले आहे-
जातस्य ही ध्रुवो मृत्यूर्ध्रुवं जन्म मृतस्य च। तस्माद् अपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि॥


या जगात जो जन्मतो, त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू होतो, त्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. यासाठी हे अर्जुना, सृष्टीच्या या अटळ नियमांना लक्षात घेऊन तू कधीही शोक करू नकोस.बुद्धिमान समजला जाणारा सर्वश्रेष्ठ असा मानव प्राणी मात्र हे विसरतो की, एके दिवशी आपणासदेखील या जगातून जावयाचे आहे. या मानवी देहात येऊन भौतिक धनसंपदा साठविली. सर्वांशी नाते जोडले. यश प्राप्त केले. कुटुंब पोसले. सर्व सुखांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या या आयुष्यात आम्ही सर्व (चारही) आश्रमांमध्ये राहून कर्तव्यकर्मे करण्याचा प्रयत्न केला.ब्रह्मचर्य आश्रमी शरीर, मन, बुद्धीचा विकास साधत विद्या ग्रहण केली व त्याच्या आधारे धन मिळवण्यास प्रारंभ केला. नंतर विवाह करून गृहस्थाश्रमामध्ये पत्नीसुख अनुभवले व मुले जन्माला घालून आपल्या कुटुंबाचा विस्तार केला.

 
सगळे सोयरे जोडून कौटुंबिक नावलौकिक मिळवण्याचा व सामाजिक कार्याद्वारे यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. पुढे उतारवयात वानप्रस्थाश्रमाचा अंगीकार करून विस्मृत झालेली विद्या व ज्ञानाला संवर्धित करण्याचा प्रयत्न केला. शक्य झाले, तर चतुर्थ संन्यास आश्रमाचा स्वीकार करून समाज व राष्ट्राकरिता जीवन वाहिले. हे चारही आश्रम सर्वांना शक्य नसतात. अलीकडच्या काळात तर केवळ ब्रह्मचर्य व गृहस्थ या दोनच आश्रमांचे प्रचलन आहे. दुर्दैव हे की, हे दोन्ही आश्रमदेखील व्यवस्थितपणे पाळता येत नाहीत. कसे तरी जगायचे आणि कसेबसे आयुष्य कंठायचे शेवटी वेळ येते, ती या जगाचा निरोप घेण्याची, यालाच मृत्यू असे म्हटले जाते. पण, दुर्दैव हे की, मृत्यू कोणालाच नकोसा आहे. सर्वजण यापासून दूर राहू इच्छितात. जगाचे हे आश्चर्य आहे की, मृत्यू नावाच्या या निश्चित व अनिवार्य गोष्टीला कोणीही स्वीकारावयास तयार नाही, अशा या जगाविषयी आश्चर्य व्यक्त करीत थोर नीतिज्ञ आचार्य भर्तृहरी म्हणतात-

व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ती,
रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम्।
आयु: परिस्रवति भिन्नघटादिवाम्भो,
लोकस्तथापि अहितमाचरतीति चित्रम्॥


म्हणजेच भयभीत करणारी वृद्धावस्था समोर उभी आहे. अनेक प्रकारचे रोग हे शत्रूंप्रमाणे शरीरावर आक्रमण करीत आहेत. फुटलेल्या घागरीतून ज्याप्रमाणे सतत पाण्याचे थेंब खाली गळावेत, त्याप्रमाणे आयुष्य हळूहळू क्षीण होत चालले आहे. अहो, किती आश्चर्याची गोष्ट आहे पाहा. एवढे असूनही हे सारे जग मात्र आपापल्या पापकृत्यांमध्ये तल्लीन आहे.पण, काहीही झाले तरी मृत्यू कोणालाही सोडत नाही. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, वेळ-काळ कोणताही असो, या जगात येणार्‍याला एके दिवशी हे जग सोडावयाचे आहे. जावयाचे तरी आहेच, पण ते रडत रडत नव्हे, तर आनंदाने जसे आमचे येणे आनंदाचे, तसेच जाणेदेखील आनंदाचे व्हावयास हवे. आम्ही जन्माचे स्वागत केले, मृत्यूचे स्वागत का म्हणून करु नये. याचाच अर्थ असा की, आम्हाला मृत्यूचे रहस्य समजले नाही. खरे तर मृत्यू हा जीवात्म्याचा नव्हे, तो तर शरीराचा आहे. कारण, आत्मा हा अजर व अमर आहे, तर देह नाशवंत आहे. आत्मा हा चेतन तर मन व इंद्रिये यांच्याशी संयुक्त झालेला देह हा जड आहे. याविषयी श्रीकृष्णांनी म्हटले आहे-

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:॥
 
या आत्म्याला शस्त्रे छेदू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी ओले करू शकत नाही आणि हवा सुकवू शकत नाही. पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह जेव्हा आत्म्याशी संयुक्त होतो, तेव्हा तो जीवात्मा बनून या सृष्टीत पदार्पण करतो. जेव्हा याचा सृष्टीतील कार्यभार संपतो, तेव्हा हा आत्मा आपला जुना झालेला देह त्यागून नवा देह धारण करतो. जन्मासोबत मृत्यूदेखीलसोबत आलेलाच आहे, योग्य वेळी याला परतावेच लागेल. या देहाला निरोप देणे हे आपले कर्तव्य नव्हे काय? गदिमांच्या शब्दात सांगावयाचे झाले, तर 

जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!


आत्म्याने या देहातून प्रयाण केल्यानंतर या देहाचा शेवटचा संस्कार उरतो, तो म्हणजेच अंतिम संस्कार! ज्या आत्म्याने या देहात निवास करून आपली जीवनयात्रा सफल केली, त्या देहाला आता सर्वांनी मिळून निरोप द्यावयाचा. शेवटचा विधी तो अंत्यविधी! (क्रमशः)

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य