'इछामती' प्रकरणी विहिंपचे राष्ट्रपतींना पत्र; 'CBI-NIA' मार्फत तपासाची केली मागणी!

    03-Apr-2024
Total Views |

VHP

नवी दिल्ली :
मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील इछामती येथे नुकतीच सीएए निषेधार्थ रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान दोन बिगर आदिवासी स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला असून विश्व हिंदू परिषदेने (विहिप) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र (VHP letter) लिहित या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस बजरंगलाल बागडा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील इछामती या गावात सीएए विरोधी रॅलीनंतर ईशान सिंग आणि सुजित दत्ता या दोन स्थलांतरित मजुरांची निर्घृण हत्या करण्यात आली. वास्तविक मेघालय सहावे अनुसूचित राज्यामध्ये असल्याने या जिल्ह्याला सीएएमधून सूट देण्यात आली आहे. असे असतानाही येथील एका दबाव गटाकडून सीएए विरोधात रॅली काढण्यात आली. या दरम्यान ईशान आणि सुजित या निष्पापांचा बळी गेला.

हे वाचलंच का? : आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसला भारतविरोधी शक्तींकडून पाठिंबा!

सदर प्रकरणी राष्ट्रपतींनी स्वतः हस्तक्षेक करून सीबीआय किंवा एनआयएकडून सखोल तपास करावा, वेळेत न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयाद्वारे करावी, पीडित कुटुंबांना भरपाई, नोकऱ्या आणि योग्य सुरक्षा देण्यात यावी, संपूर्ण प्रदेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षितता आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी आणि बेकायदेशीर व्यक्ती आणि गटांना रोखण्यासाठी जलद कारवाई करावी तसेच आचारसंहिता लागू असताना आणि राज्यात सीएए लागू नसतानाही अशा रॅलीला परवानगी देणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या विहिंपने पत्राद्वारे केल्या आहेत.

मेघालयात राहणाऱ्या गैर-आदिवासी किंवा अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध दहशतवाद, सततची हिंसा आणि भेदभाव याच्या स्मरणार्थ या हत्या आहेत. भाषिक अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना सतत लक्ष्य केले जाते आणि अशा भयानक गुन्ह्यांना वारंवार बळी पडतात हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. हा हल्ला म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून तथाकथित 'अज्ञात गटां'ची पूर्वनियोजित चाल आहे, असे विहिंपने आपल्या पत्रातून म्हटले आहे.


स्थानिक विद्यार्थी संघटनेशी संबंधित दोन जणांना अटक
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इचामती गावात झालेल्या दोन तरुणांच्या हत्येप्रकरणी स्थानिक विद्यार्थी संघटनेशी संबंधित दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे चेरापुंजीच्या सोहरा भागातील रहिवासी आहेत. मेघालय सरकारने प्रत्येक पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. या घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.