दिवंगत पतीच्या स्मरणार्थ पत्नीकडून कोट्यवधींची संपत्ती गरजूंसाठी समर्पित

    03-Apr-2024
Total Views |

Seva Bharati - Keral

तिरुवनंतपुरम
: केरळच्या अलप्पुझा येथील राजम्मा नावाच्या महिलेने आणि तिच्या कुटुंबाने आपली जमीन आणि करोडो रुपयांचे घर सेवा भारतीला (Seva Bharati Kerala) समर्पित केले आहे. राजम्मा यांनी आपले दिवंगत पती बालराजन यांच्या स्मरणार्थ समाजातील गरजूंसाठी आपली संपत्ती समर्पित केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी कुठल्याही अटीशर्तीविना हे समर्पण केले असून जमिनीवर फायदेशीर सामुदायिक उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

चंपाकुलम येथील पदिपुरक्कल येथील देवक्षेत्र सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात राजम्मा बालराजन यांनी रा.स्व.संघाचे सबरीगिरी विभाग संघचालक सीपी मोहनचंद्रन यांना ९८ सेंट (साधारण १ एकर) जमीन आणि घर समर्पित केले. सेवा भारती केरळचे उपाध्यक्ष डॉ. कृष्णन नंबूथिरी यांनी सेवा भारतीतील योगदानाबद्दल राजम्मा यांना मंगलपत्र (कृतज्ञता पत्र) देऊन सन्मानित केले.