हिंदू देवतांचा अपमान करणे भोवले; विभागप्रमुखांचा मागीतला राजीनामा!

    03-Apr-2024
Total Views |

Pondicherry University

पाँडिचेरी : पाँडिचेरी विद्यापीठातील (Pondicherry University Update) 'एझिनी २०२४' या वार्षिक सांस्कृतिक उत्सवादरम्यान सादर करण्यात आलेल्या 'सोमयानम' नावाच्या नाटकातून सनातन धर्म आणि पूज्य हिंदू देवतांचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला होता. या प्रकरणी कलापेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रशासकाने परफॉर्मिंग आर्ट्सच्या विभागप्रमुखांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
परफॉर्मिंग आर्ट्स विभागाअंतर्गत नाटकाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम, सीता माता आणि भगवान हनुमंतासारख्या हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात तीव्र निदर्शने करत यासंदर्भात निवेदन जारी केले होते. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संतापामुळे, पाँडिचेरी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत निर्मात्यांविरूद्ध एफआयआर नोंदवला होता. तसेच विद्यापीठानेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती.

हे वाचलंत का? : केजरीवालांच्या अडचणीत वाढ, मद्य धोरण बनविण्यात प्रत्यक्ष सहभाग!

मिळालेल्या माहितीनुसार समितीच्या शिफारसी आणि अहवाल येणे बाकी असताना विद्यापीठाने परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विभागप्रमुखांना त्यांच्या पदावरून पायउतार होण्यास सांगितले आहे. विद्यापीठाकडून तक्रारकर्त्यांना देण्यात आलेल्या संप्रेषणात म्हटले आहे की, 'विद्यापीठ कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आपल्या कॅम्पसमध्ये धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही.'

नाटकाचे निर्माते काय म्हणाले?
पाँडिचेरी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘टीम सोमयानम’ या सांस्कृतिक गटाने हे नाटक सादर केले. नाटकाच्या निर्मात्यांनी सादर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'या नाटकाचा हेतू कोणत्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा नाही. आम्ही स्वतः वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे आहोत, आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धांचा समान आदर करतो. जर आम्ही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.'