घड्याळ चिन्हाविषयी शरद पवार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

    03-Apr-2024
Total Views |
Sharad Pawar

नवी दिल्ली:
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ चिन्हाविषयी ते तात्पुरते असल्याचे अस्वीकरण न देताच वापरल्याचा आरोप करून शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. घड्याळ चिन्हाचा वापर हा न्यायालयीन मुद्दा आहे, असे अस्वीकरण राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व जाहिरातींमध्ये द्यावा, असे न्यायालयाने निर्देश दिले होते. याबाबत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन केले नाही असा आरोप शरद पवार यांच्यातर्फे करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अजित पवार गटाला १९ मार्चच्या न्यायालयाच्या आदेशानंतर किती जाहिराती प्रसिद्ध झाल्या हे दाखवा, असे सांगितले आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटातर्फे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने १९ मार्च रोजी अजित पवार यांना घड्याळ चिन्हाविषयी अतिशय स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, अजित पवार यांच्याकडून या निर्देशांचे पालन करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.