दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवाल यांची तब्येत खालावली, २१ मार्चपासून ईडी कोठडीत!

    03-Apr-2024
Total Views |
Delhi Liquor Scam Kejriwal Health Update


नवी दिल्ली :   
  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगबाबत त्यांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली न्यायालयाने केजरीवालांच्या ईडी कोठडी दि. १५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आता अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, ईडी कोठडीत अरविंद केजरीवाल यांचे ४.५ किलो वजन घटले असून डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ईडीकडून केजरीवाल यांना दि. २१ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असून १५ एप्रिलपर्यंत त्यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच, केजरीवाल यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे.


हे वाचलंत का? - केजरीवालांच्या अडचणीत वाढ, मद्य धोरण बनविण्यात प्रत्यक्ष सहभाग!


काय आहे दिल्ली मद्य घोटाळा?, असे आहेत आरोप

मद्यविक्रीसाठी परवाना घ्यावा लागतो, त्यामध्येही घोटाळा केल्याचा आरोप आहे. यासाठी शासनाने परवाना शुल्क निश्चित केले आहे. सरकारने अनेक श्रेणी तयार केल्या होत्या. या अंतर्गत मद्य, बिअर, विदेशी मद्य आदींची विक्री करण्याचा परवाना दिला जातो. ज्या परवान्यासाठी अगोदर २५ लाख रूपये भरावे लागत होते, त्याच परवान्यासाठी नव्या धोरणानुसार ५ कोटी रुपये द्यावे लागत होते. बड्या दारू व्यापाऱ्यांना फायदा व्हावा यासाठी दिल्ली सरकारने जाणीवपूर्वक परवाना शुल्कात वाढ केल्याचा आरोप आहे.

त्यामुळे छोटय़ा ठेकेदारांची दुकाने बंद पडली आणि बाजारात केवळ बड्या दारू माफियांना परवाने मिळाले. या बदल्यात दारू माफियांनी 'आप'चे नेते आणि अधिकाऱ्यांना लाच म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर सरकारचा असा युक्तिवाद आहे की परवाना शुल्क वाढवून, सरकारने एकरकमी महसूल मिळवला. यामुळे सरकारने कमी केलेल्या उत्पादन शुल्क आणि व्हॅटची भरपाई केली आहे. याद्वारे आप सरकारने परवान्यापोटी जवळपास ३०० कोटी रूपये घेतले होते. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप आहे.