"आमच्या उष्ट्यावर उबाठाचं..."; शेलारांचा घणाघात

    03-Apr-2024
Total Views |
 
Ashish Shelar
 
मुंबई : आमच्या उष्ट्यावर उबाठा गटाचं पोट भरत आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी उबाठा गटात प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना शेलारांनी उबाठावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
आशिष शेलार म्हणाले की, "आमच्या उष्ट्यावर ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उबाठा गटाची आहे. आमच्याकडून जे उष्ट्यावर टाकलं गेलं आहे त्यावर पोट भरणं हे संजय राऊतांना लखलाभ आहे," असे ते म्हणाले आहेत. उबाठा गटाच्या पोटातली भीती आता निवडणूक आयोगाकडे तक्रारीच्या रुपाने दिसत आहे, असेही ते म्हणाले.
 
 
हे वाचलंत का? - उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर! वाचा कोण कुठे लढणार...
 
ते पुढे म्हणाले की, "तुझ्या गळा माझ्या गळा असं करत करत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकमेकांचा गळा पकडायला निघाले आहेत. काँग्रेसने तर उबाठा गटाच्या विरोधात मैत्रीच्या लढतीची घोषणा केली. सांगली, सातारा मध्ये कोण कुणाच्या विरोधात लढणार, कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, हे अजूनही ठरत नाहीये. वंचितवर आरोपांच्या फैरी झाडण्याचं काम काँग्रेस आणि उबाठा करत आहे. त्यामुळे एकमेकांचा गळा पकडणारे लोकं महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं काय करणार?" असा सवालही त्यांनी केला आहे.