महाराष्ट्रदिनी मुंबईत गिरणी कामगारांचा भव्य मेळावा

29 Apr 2024 20:21:46

girni kamgar


मुंबई, दि. २९ : प्रतिनिधी 
गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
गिरणी कामगार संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने बुधवार, दि. १ मे २०२४ गावस्कर सभागृह, मराठी ग्रंथ संग्रहालय, शारदा टॉकीजजवळ दादर पूर्व येथे सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१५ मार्च २०२४ रोजी शासनाने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंबंधी जाहीर केलेल्या धोरणासंदर्भात संघर्ष समितीची भूमिका यावेळी स्पष्ट केली जाईल. तसेच,पात्रता निश्चिती अर्जाबाबत निर्णय घेतला जाईल.
बोरिवली खटाव मिलचा तिढा सुटला असून ती जमीन खटाव मिल विकासक मॅरेथॉन यांच्याकडे ताबा गेला आहे. या चाळीस एकर जमीनबाबत पुढील रणनिती ठरविण्यात येईल. तसेच एन. टि. सी. गिरण्यांच्या जमिनी घरासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून निर्णय घेतला जाईल. कोनगाव पनवेल येथील घरांचा ताबा लवकर मिळावा व आकारण्यात आलेला अवास्तव देखभाल खर्च कमी व्हावा म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. याशिवाय कामगार दिनी जे गिरणी कामगार या लढ्यात सोबत आहेत व संघटनेला बळ देत आहेत अशा सबंध महाराष्ट्रातील लढाऊ गिरणी कामगारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात येईल. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण घाग, सचिव प्रवीण येरुणकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असतील. राज्यभरातील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जागतिक कामगार दिनी कामगार एकजुटीचा आवाज बुलंद करावा असे आवाहन अध्यक्ष प्रवीण घाग व सचिव प्रवीण येरूणकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0