"मत देताना अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारींची आठवण ठेवा!", सपा नेता बरळला

    29-Apr-2024
Total Views |

SP


वाराणसी : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या सभेत माफिया आणि कुख्यात गुंडांच्या मदतीने मते मागितली जात आहेत. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मृत शहाबुद्दीन, अतीक अहमद, अशरफ आणि मुख्तार अन्सारींच्या नावाने मते देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रॅलीत आजम खान यांच्याही आठवणी सांगण्यात आल्या, त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा दाखला देण्यात आला. सपा समर्थकांनी या भाषणाचा विरोध करण्याऐवजी या भूमिकेचे स्वागत केले आहे. रविवारी २८ एप्रिल रोजी ही सभा घेण्यात आली होती.

संभल लोकसभा निवडणूकीतील प्रचारादरम्यान ही वक्तव्ये करण्यात आली होती. समाजवादी पार्टी पक्षातर्फे आमदार जियाउर्रहमान यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहे. जियाउर्रहमान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या शफीकुर्रहमानचे नातू आहेत. सपाच्या तिकीटावर कुंदरकी विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. ही घटना घडली त्यावेळी अखिलेश यादव यांच्यासह सपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मोहम्मद उस्मान बोलण्यासाठी उपस्थित होते. भाषण सुरू केल्यानंतर काही वेळानंतर वादग्रस्त वक्तव्ये सुरू केली. उत्तर प्रदेशातील बुलडोझर बाबा अॅक्शनला त्यांनी आक्षेप घेतला. सपा समर्थकांनी बुलडोझरची कारवाई रोखण्यासाठी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे वक्तव्य आमदाराने केले. यानंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये एक जोष संचारला.

यानंतर आमदाराचा तोल सुटला. बिहारपासून उत्तर प्रदेशच्या सर्वच माफियांची आठवण काढली. सपा आमदार उस्मान म्हणाला, "शहाबुद्दीन, अतीक, अशरफ, मुख्तार यांचे स्मरण करुनच मतदान करा." आमदाराच्या या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या पिटल्या. शहाबुद्दीन, अतीक अहमद, मुख़्तार अन्सारी आणि अशरफ या माफियांनी केवळ हिंदूच नव्हे तर अत्याचार करत असताना जाती धर्म काहीच पाहिला नाही. त्यांच्या काळ्या कारनाम्यांच्या फाईल्स आजही सरकारदरबारी आहेत. या गुन्हेगारांच्या नातेवाईकांनीही अनेक निरपराधांना त्रास दिला.

आजम खानवर सुरू असलेली कायदेशीर कारवाईही ही जूलमी असल्याचा उल्लेख त्याने केला. आमदाराने दिल्लीतील रस्त्यांवर नमाज पठण करणाऱ्या गर्दीला हटविणाऱ्या पोलीस उपायुक्त मनोज तोमरचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. मतदान करताना तोमरला विसरू नका, असेही तो म्हणाला. अखिलेश यादव यांनी हे भाषण आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.