साडेतीन तास हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प

मस्जित बंदर ते सीएसएमटी दरम्यान डबा पटरीवरून घसरला

    29-Apr-2024
Total Views |

central railway

मुंबई, दि.२९ : प्रतिनिधी 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सोमवार दि.२९ रोजी सकाळी ११.१५च्या दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल दोन ते अडीच तास खोळंबली होती.
यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या एका डब्याची ट्रॉली सकाळी ११.३५च्या सुमारास फलाट क्रमांक २ वर येताच रुळावरून घसरली. लोकलचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे हार्बर सेवेच्या दोन्ही लाइनवरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सीएसएमटी स्थानकात लोकल प्रवेश करत असतानाच लोकल रुळावरुन घसरली आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने विस्कळीत झाली होती, त्यानंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या मस्जिद स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. यादरम्यान वडाळा स्थानकापर्यंत हार्बर लाईन सेवा सुरू होती. रुळावरून घसरलेल्या कोचची ट्रॉली दुपारी १.१५ वाजता पुन्हा रुळावर आली. दुपारी १.५५ वाजता ट्रॅक मोकळा करण्यात आला. दुपारी तीन वाजता ट्रॅक फिट असल्याची खात्री मिळाली यानंतर सीएसएमटीवरून पहिली ट्रेन ३.०६ वाजता बेलापूरच्या दिशेने निघाली.