गांधीनगर : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोहम्मद सकलेन नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो जामनगरचा रहिवासी आहे. त्याने भारतीय सिमकार्ड खरेदी करून त्यावर व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट केले होते. हा व्हॉट्सॲप नंबर पाकिस्तानात सक्रिय होता. त्याचा वापर करून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची हेरगिरी केली जात होती. ऑक्टोबर २०२३ मध्येच त्याचा पर्दाफाश झाला. त्यावेळी काही आरोपीही पकडले गेले. मात्र, आता मोहम्मद सकलेनला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद सकलेन हा अनेक महिन्यांपासून फरार होता. सकलेनने हेरगिरीसाठी भारतीय लष्कराच्या जवानांच्या फोनवर मालवेअर व्हायरस पाठवला होता. यानंतर त्यांच्या मोबाईल फोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. संशयास्पद लिंक्स पाठवून फोन डेटा हॅक केला गेला, त्यानंतर भारतीय लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली गेली. हा क्रमांक तपासला असता तो जामनगर येथील मोहम्मद सकलेन याच्या नावे नोंदविण्यात आलेला होता.
तपासादरम्यान त्याने हे सिम त्याचा साथीदार असगर याला दिल्याचे समोर आले. त्यात हे सिम पुन्हा तारापूर, आनंद येथील लाभशंकर माहेश्वरी यांना देण्यात आले. तो पाकिस्तानात राहत होता आणि १९९ मध्ये भारतात आला होता. २००५ मध्ये त्यांने पत्नीसह भारतीय नागरिकत्व प्राप्त केले. त्याने २०२२ मध्ये पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता, पण त्याला विलंब होत होता. त्यानंतर तो पाकिस्तानात राहणाऱ्या त्याच्या मावशीचा मुलगा किशोर रामवानी याच्याशी बोलला.
यानंतर किशोरने त्याला व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितले होते. यानंतर पती-पत्नीचा व्हिसा मंजूर झाला आणि तेही पाकिस्तानात गेले. त्यानंतर त्याने आपली बहीण आणि तिच्या मुलीसाठी पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला आणि तो स्वीकारला. याआधीही पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे लोक पकडले गेले आहेत. गुजरातमधील जामनगरमध्ये एटीएसला नवे यश मिळाले आहे.