नवी मुंबईतील ‘या’ तलावावर फ्लेमिंगोचे का होतायत मृत्यू?

    29-Apr-2024
Total Views |

flamingo deaths

मुंबई (विशेष प्रतिनिधी): नवी मुंबईत असलेल्या डीपीएस तलावाजवळ गेल्या पंधरा दिवसांत ९ फ्लेमिंगोंचा (Flamingo) मृत्यू झाला आहे. पहिल्या झालेल्या घटनेमध्ये ४ फ्लेमिंगो (Flamingo) मरण पावल्याची माहिती असून या घटनेची आता दुसऱ्यांदा पुनरावृत्ती झाली आहे.


डीपीएस तलावावर होणाऱ्या फ्लेमिंगोंच्या (Flamingo) मृत्यूला अनेक कारणे असल्याचं तज्ञांकडून सांगितलं जात आहे. जेट्टीवर लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्समुळे फ्लेमिंगोना बघायला त्रास झाल्यामुळे त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर, उन्हाळ्यामुळे तलावाच्या पाणी पातळीत घट झालेली दिसून आली असून हे ही फ्लेमिंगोच्या (Flamingo) मृत्यूचे कारण ठरण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेमध्ये ५ फ्लेमिंगो (Flamingo) पक्षी लाईटच्या उजेडाचा अंदाज न आल्यामूळे समोरच्या माहिती बोर्डाला धडकले. या अपघातामध्ये ४ फ्लेमिंगोचा (Flamingo) जागीच मृत्यू झाला तर १ फ्लेमिंगो रेस्क्यू करण्यात यश मिळालं होतं. याच घटनेची पुनरावृत्ती होत आता १२ फ्लेमिंगोचा अपघात झाला आहे. त्यापैकी ५ फ्लेमिंगो (Flamingo) दगावले आहेत. या दोन्ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामूळे लाईटच्या तीव्रतेमूळे हा अपघात झाल्याची दाट शक्यता तज्ञांकडून नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र वनविभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कांदळवन कक्ष व इतर काही स्थानिक एनजीओजच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

“पक्ष्यांच्या फ्लाईट एरियामध्ये येणारे अडथळे दुर करत यावर तोडगा काढण्यात येईल. जेट्टीवर लावण्यात आलेल्या एलईडी लाईट्स सध्या ज्या कोनात आहेत त्याऐवजी ४५ अंशाच्या कोनात ते लावले तर पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामूळे तशी तरतुद आम्ही करतोय”, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक राहूल खोत यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.