तुम्ही बाळासाहेबांचीच चिंता करा!

    29-Apr-2024
Total Views |
UBT
कृतघ्नपणा कशाला म्हणतात, याचे जीवंत उदाहरण म्हणजे सध्या उद्धव ठाकरे करीत असलेली वक्तव्ये होत. ज्या भाजपच्या आधारावर शिवसेनेच्या नेत्यांनी सत्ता उपभोगली, त्या भाजपबरोबर असताना घेतलेले अनेक निर्णय अयोग्य किंवा चुकीचे होते, असे आता म्हणताना आपण स्वत:वरच टीका करीत आहोत, याचीही जाणीव ठाकरे यांना झालेली नाही. मोदी यांना मत का देऊ नये, याचा बोटभरही युक्तिवाद त्यांना करता आलेला नाही.
लोकसभा निवडणुकीत आपल्या केलेल्या कार्याची दवंडी पिटून नेते जनतेकडून मते मागत असतात, पण ज्यांनी कसलेही भरीव कार्यच केलेले नाही, असे नेते कशाच्या जोरावर मते मागतात? तर ते आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या कार्यात नसलेल्या उणिवा शोधतात, त्यांच्यावर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करतात. महाराष्ट्रात सध्या याचाच अनुभव मतदारांना येत आहे. रत्नागिरीमध्ये नुकतीच शिवसेनेच्या उरल्यासुरल्या गटाच्या प्रमुखांची, म्हणजे उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली. त्यातील भाषणात लोकसभा निवडणुकीत जनतेकडून मते मागताना ती कशाच्या जोरावर मागावीत, हा प्रश्न त्यांना पडलेला स्पष्टपणे दिसत होता. तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणेच तर्काला आणि विवेकबुद्धीला रजा देऊन काहीही आक्रस्ताळी विधाने केली. ओढूनताणून आणलेल्या श्रोत्यांना त्यांच्या वक्तव्यांवर टाळ्या वाजविणेही अवघड जात होते, हेही दिसत होते. या श्रोत्यांना बळजबरीने आणून बसविल्याचे जाणवत होते.
 
 
गेली २५ वर्षे ज्यांच्या आधाराने सत्ता उपभोगली आणि राजकारणात टिकाव धरला, ज्या मुद्द्यांवर मते मागितली, त्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधी वक्तव्य करणे किती अवघड असते, त्याची जाणीव त्यांच्या वाक्या-वाक्यागणिक होत होती. अगदीच काही सुचले नाही की, विरोधकांच्या वैयक्तिक गोष्टींवर टीका करण्याची पातळीही गाठली. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षितच असल्या, तरी त्यांना इतक्या खालच्या पातळीवर गेल्याचे पाहून त्यांची कीवही येईनाशी झाली. रत्नागिरीतील त्यांचे भाषण म्हणजे कृतघ्नपणा कशाला म्हणतात, त्याचे उत्तम उदाहरण ठरावे.
 
उद्धव ठाकरे यांचे भाषण हे नेहमीप्रमाणेच कसलाही शेंडा-बुडखा नसलेले आणि कोठूनही कोठेही जाणारे होते. ना त्यात काही तर्कसंगती होती, ना विषयाची सुसंगत मांडणी. तकलादू युक्तिवाद आणि पोरकट टोमणे यांच्याबरोबरच नेहमीचीच ‘धनुष्यबाण चोरला, वडील चोरले’ वगैरे भंपक वक्तव्ये केली. मोदी हे जणू शिवसेनेमुळेच मोठे झाले, असा आव आणणारे वक्तव्य म्हणजे तर हास्यास्पदतेचा कळसच. राजकारणात कोणीही कोणालाही मोठे करीत नसतो. जो तो आपल्या कर्तृत्त्वानेच मोठा होत असतो. मोदी यांना मोठे करण्याइतके कर्तृत्व तुमच्याकडे होते, तर तुम्ही (शिवसेना) का छोटे राहिलात, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.
 
तुम्ही इतके मोठे होतात, तर तुमचेच सहकारी तुम्हाला सोडून का गेले, याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. कोकणात कोणताही विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही, असे सांगताना कोकणात कोणताच प्रकल्प येऊ दिला जाणार नाही, हेच त्यांना सूचित करायचे होते. कारण, कोकणातील प्रत्येक प्रकल्पाला विरोध हा त्यांच्याच गटाने केला. पण, ‘प्रकल्पाला विरोध करूनही आपण विकासाच्या गोष्टी करीत आहोत आणि ते (भाजप) विनाशाच्या गोष्टी करीत आहेत,’ असा त्यांचा अजब युक्तिवाद.
 
महाराष्ट्रात येणारा प्रकल्प त्यांच्या विरोधामुळे अन्य राज्यात गेला की, हेच तोंड वर करून गळा काढायलाही मोकळे! ‘मोदी यांना मत म्हणजे विनाशाला मत,’ हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य ऐकल्यावर परदेशी गुंतवणूदार कदाचित घेरी येऊन पडतील.
‘महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आहे,’ या त्यांच्या वक्तव्यावर तर श्रोत्यांना हसावे की रडावे, हेच कळेनासे झाले. उद्धव ठाकरे यांच्या केवळ अडीच वर्षांच्या काळात सरकारपुरस्कृत गुंडगिरीची इतकी उदाहरणे आहेत, की त्यांची जंत्री करणेही अवघड.
 
करमुसे मारहाण प्रकरण, वाझे प्रकरण, बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये उकळण्याचे प्रकरण ही काही ठळक उदाहरणे. ज्यांनी ‘कोविड’सारख्या जीवघेण्या महामारीतही स्वत:चे खिसे भरण्याची संधी सोडली नाही, अशांनी गुंडगिरीवर प्रवचन द्यावे, हे फारच झाले. काही वेळानंतर त्यांनी ईडी, सीबीआय या संस्थांच्या अधिकार्यांना धमक्याही दिल्या. वास्तविक या संस्थांमधील अधिकारी हे त्या संस्थांसाठी आणि त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या पुराव्यांनुसार काम करीत असतात. ते सरकारचे कर्मचारी आहेत. ज्या नेत्यांविरोधात ते कारवाई करतात, त्यांच्याशी त्यांचे वैयक्तिक हेवेदावे नसतात. तो त्यांच्या कामाचा भाग असतो.
 
पण, ‘आपला गट सत्तेवर आल्यावर आपण या अधिकार्यांच्या नांग्या ठेचू,’ अशी धमकीयुक्त भाषा वापरून उद्धव ठाकरे यांनी आपल्या डूख धरणार्या खुनशी वृत्तीचे आणि आकसाचेच प्रदर्शन केले. ‘राजन साळवी यांच्या घरात घुसलात, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले खरे, पण त्यांनी यापूर्वीच सत्तेत असताना अभिनेत्री कंगना राणावतचे घर व कार्यालय न्यायालर्याची परवानगी नसतानाही तोडले होते. एका ‘सुशांत’ स्वभावाच्या अभिनेत्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात ठाकरे यांचे सरकार अवाजवी स्वारस्य का दाखवित होते, हाही प्रश्न जनतेला पडला आहे.
 
उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांची कारकीर्द हे एक ‘भयानक दु:स्वप्न’ म्हणूनच महाराष्ट्रातील जनता कायमची लक्षात ठेवील. त्यामुळे, हे पुन्हा सत्तेच्या आसपासही फिरकणार नाही, याची काळजी घेण्याइतकी महाराष्ट्राची जनता नक्कीच सुबुद्ध आहे. ‘मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द पाहून स्वर्गवासी अटलबिहारी वाजपेयी यांचा आत्मा ढसाढसा रडत असेल,’ असे वक्तव्य त्यांनी केले. पण, तुमची केवळ अडीच वर्षांची कारकीर्द पाहून आणि सध्याचे तुमचे राजकारण पाहून स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याचीही उद्धव ठाकरे यांनी कल्पना करावी. ‘हिंदुहृदयसम्राट’ असे बिरूद मिरविणार्या या नेत्याचे वर्णन तुम्हीच ‘जनाब’ असे केले होते, त्याचा विसर तुम्हाला पडला असला, तरी तो जनतेला पडलेला नाही. उद्धव ठाकरे यांचे रत्नागिरीतील भाषण म्हणजे आपली राजकीय कारकीर्द बहुदा संपुष्टात आल्याची जाणीव झालेल्या एका रडतराऊच्या उद्ध्वस्त मन:स्थितीचे दर्शन घडविणारे होते.