सद्विचार, विवेकाचे विद्यापीठ म्हणजे संत तुकडोजी महाराज

    29-Apr-2024
Total Views |
 Sant Tukdoji Maharaj
 
दि. २९ एप्रिल १९०९ ते दि. १० नोव्हेंबर, १९६८ अशा ५९ वर्षांच्या जीवनप्रवासात अस्सल भारतीयत्व घेऊन समाजोद्धारासाठी कटिबद्ध असलेले संत तुकडोजी महाराज १९४२च्या आंदोलनातही सहभागी झाले होते. देशकार्यासाठी झोकून देऊन ‘भारत सेवक समाजा’चेही त्यांनी काम केले. सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम चालू आहे. संत तुकडोजी महाराजांची दूरदृष्टी दिसते, ते म्हणतात, “तैसेचि आहे निवडणुकीचे, कामची पहावे सगळ्यांनी त्यांचे, काम अधिक मोलाचे, तोची निवडावा मुख्य ऐसा।” जनतेसाठी जो दिवसरात्र काम करतो, त्यालाच मतदान करा.
 
विदर्भाच्या पुण्यभूमीमध्ये जन्म झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म जणू समाजाच्या सर्वांगीण कल्याणाकरिता झाला होता. राष्ट्रसंत तुकाडोजींचे जीवन अनुभवांनी समृद्ध होते. ‘देखा फिरा मैंने, संसार सारा’ असे म्हणत त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्य, वैज्ञानिक आणि राष्ट्रीय अशा अनेकविध विषयांना समाजासमोर आणले. सर्वधर्म परिषदेच्या निमित्ताने ते जपानला जाऊन आले. त्यांच्या संपूर्ण चिंतन लेखनातून, साहित्यातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समस्त समाजाला उपयोग झाला.
 
अखिल मानव जातीच्या कल्याणाचा, उत्कर्षाचा विचार मांडत असताना प्रत्यक्ष कृती करून त्यांनी नवा आदर्श घालून दिला. त्यांनी आपल्या जीवनकाळात अनेक गद्य-पद्य स्वरुपाची ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांच्या ग्रंथसंपदेतील प्रत्येक शब्द अन् शब्द सजीवांच्या उद्धारासाठीच असल्याचे जाणवते. त्यांचा ‘ग्रामगीता’ हा बहुआयामी ग्रंथ म्हणजे संस्कारक्षम करणारी विचार प्रबोधिनीच म्हणावी लागेल.
 
संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दु:खमुक्तीमार्गाचे असलेले वैज्ञानिक जनक, राजमाता जिजाऊसाहेबांच्या संस्कारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रखर राष्ट्रभक्तीचा, साध्वी सावित्रीबाईंच्या स्त्रीशिक्षणाचा, महात्मा जोतीराव फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा, आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचा, संत गोरोबा कुंभारांच्या निष्काम भक्तीचा, संत सावता महाराजांची कर्मप्रवण ईश्वरभक्तीचा, संत रामदासस्वामी यांच्या प्रपंच आणि परमार्थाचा, संत कबीरांचा मानवतावाद, संत एकनाथांचे तत्वज्ञानी भारुड, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विश्वात्मक आर्ततेचा, संत सेवायोगी गाडगेबाबांच्या ग्रामशुद्धीचा, गुरुगोविंद सिंहांच्या पंचप्यारांच्या बलिदानाचा, साने गुरुजींच्या बलसागर भारताचे स्वप्न आदी विषयांवर मनोज्ञ आणि प्रेमळ भाष्य केले आहे, ते मुळातून वाचले पाहिजे असे आहे.
 
सिद्धार्थ गौतमांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले नाही. त्यांनी ‘अत्त दीप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, असा कृतिशील संदेश दिला. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दु:खमुक्तीमार्गाचे वैज्ञानिक जनक होते. त्यांनी जगाला दु:खमुक्तीचा मार्ग दिला, त्यासाठी त्यांनी विपश्यनेचा आग्रह धरला. राष्ट्रसंत तुकडोजींनी ‘सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून शरीर-मन शुद्ध होते, मनाला स्थिरता मिळते,’ असे सांगितले. तुकडोजी महाराज भगवान बुद्धांबद्दल म्हणतात,
हाती न घेता तरवार। बुद्ध राज्य करी जगावर।
त्यासि कारण एक प्रचार। प्रभावशाली।
 
आद्यसमाजसुधारक महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जातीभेद निर्मूलन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुले करणारे ते कर्ते सुधारक होते. विधवांचे केशवपन करण्याविरोधात त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. पत्नी सावित्रीबाईंना साक्षर करून स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली. फुल्यांच्या या आचार प्राबल्याचे वेगळेपण तुकडोजी व्यक्त करताना म्हणतात,
लाख बोलक्यांहुनि थोर। एकचि माझा कर्तबगार।
हे वचन पाळोनि सुंदर। गांव सुधारावे कार्याने॥
 
जो कोणी मनुष्य ईश्वरास स्मरून नीतीने वागत असेल, त्याच्या जातीपातीचा, दर्जाचा, घर्माचा, देशाचा विचार न करता, सोवळ्या-ओवळ्याचे बंड न माजवता, ‘मानव तितुका एकचि आहे’ हा भाव महत्त्वाचा आहे. जगामध्ये प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. याला ईश्वरनिष्ठ मानवतवाद म्हणतात, हे महात्मा फुल्यांचे बोल तुकडोजींना भावतात. हाच आधार घेऊन ते म्हणतात,
प्रिय भावुको! श्रद्धा तुम्हारी, काम लगनी चाहिए
यह देश उंचा हो, यहा इन्सानी बढनी चाहिए॥ 
अर्थात, राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून भारत देश जगामध्ये उंच उंच झाला पाहिजे. त्यासाठी, खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी ‘राष्ट्र जागवा, राष्ट्र जगवा’ असे नारे दिले.
 
ग्रामगीतेच्या संसर्ग आणि प्रभाव अध्यायात भूदान चळवळीचे अध्वर्यू विनोबा भावे यांचा आदर्श आणि प्रभाव याबद्दल तुकडोजी महाराज म्हणतात,
अस्थिपंजर फकीर तो आज। भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज।
तरि तीच लाट उसळली सहज। गावोगावी॥
 
आचार्य विनोबा भावे यांना दि. १८ एप्रिल, १९५१ रोजी पहिले भूदान मिळाले, त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. परंतु, जनतेने त्यांनी ४७ लाख एकर जमीन भूदानात दिली. त्यातील, त्यांनी सुमारे आठ लाख भूमिहीनांना वितरित केली. या दोन्ही संख्यांकडे पाहिले, तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळात असे दान केवळ दुर्मीळच! भूदानाचे महात्म्य वर्णन करताना तुकडोजी महाराज म्हणतात,
आपली जुगारुनी सुख चैन। किती लोक दान मागती फिरून।
गरिब-अमिरही स्वार्थ विसरून। देती भूदान उल्हासे॥
 
महाराष्ट्रातील थोर संतांनी आपल्या उक्ती-कृतीतून समाजमन घडवले. अशा संत परंपरेतील संत गोरा कुंभारांच्या निष्काम कर्मयोगावर आणि निर्मळ भक्तीवर ग्रामगीतेत ‘श्रम-संपती’ अध्यायामध्ये संत तुकडोजी म्हणतात,
श्रीसंत गोरा राबे अंगे। देवहि माती तुडवू लागे।
तेथे श्रीमंत आळसे वागे। हे महापाप॥
कृषिप्रधान भारत देशातील शेतकर्यांप्रमाणे संत गोरोबांनी माती तुडवून मडक्याला आकार देत निष्काम कर्मयोग करत श्रीविठ्ठलाच्या चरणी लीन झाले. त्यांच्या घरात हरी आणि हरचे चिंतन चालत असे. त्यांनी विठ्ठलरुपात शिवभक्तीही जाणवत होती, तशीच भक्ती संत तुकडोजी महाराज अनुभवत होते. त्यामुळेच, त्यांना संत गोरोबा हृदयीचे वाटतात.
 
ग्रामगीतेतून सभ्य, सज्जन आणि तत्वज्ञ सावता महाराजांबद्दल तुकडोजी महाराज म्हणतात,
आपुले घरचि नव्हे घर। विश्व आपले मकान सुंदर।
हेचि शिकवया अरे संसार। उद्धार तो याचि मार्गे॥
शेतीकामे करताना अभंगरचना करणार्या सावता महाराजांनी पंढरीची वारी कधी केली नव्हती. सर्वांच्या कल्याणाचा विचार करत अभंगांतून व नामसंकीर्तनामधून कर्मसिद्धांत मांडला.
 
संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या ‘धर्माध्ययन’ अध्यायात समर्थ रामदास स्वामींचा आदर्श समाजापुढे ठेवतात. समर्थांच्या साहित्यातील कृतिशील विचार आजही समाजाला दिशादर्शक आहेत, हे तुकडोजी महाराजांना सूचित करायचे आहे.
गुरुजनी ऐसे द्यावेत धडे। आपुला आदर्श ठेवोनि पुढे।
विद्यार्थी तयार होता चहुकडे। राष्ट्र होई तेजस्वी॥
 
समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकडोजी महाराज यांनी समाज आणि राष्ट्रविकासाच्या मार्गासाठी विपुल साहित्य संपदा निर्माण केली. हे दोघेही महान द्रष्टे कधी कवी, कधी साहित्यिक, विचारवंत आणि समाजसुधारक म्हणून आपल्यापुढे येतात. साहित्यनिर्मिती हे त्यांचे जीवनध्येय नव्हते. राष्ट्रविकासाचे साधन म्हणून त्यांनी लेखन केले. त्याचे मोल आज तसुभरही कमी झालेले नाही.
 
आज महाराष्ट्रात पाण्याचा प्रचंड दुष्काळ पडतो की काय, अशी परिस्थिती आहे. समर्थ म्हणतात,
उदक तारक उदक मारक। उदक नाना सौख्यदायक
पहाता उदकाचा विवेक। अलौकिक आहे।
पाण्याचे महत्त्व पटवून देताना आपल्या राज्यातील जलव्यवस्थापन आणि जलसंवर्धनाची परिस्थिती पाहाता मन हेलावून जाते. तुकडोजी महाराजही पाण्याचे महत्त्व सांगतात,
‘हे नर्मदे! तेरे ही दर्शन से, सदा फुला फला।
तेरी अमित जलबिन्दुओ से, प्रेरणा ले मैं चला॥
 
संत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण १९६८ रोजी गुरुकुंज, मोझरी, जि. अमरावती येथे झाले. त्यांच्या कृतिशील कार्याने आणि प्रभावी विचारांनी ते आजही समाजात विद्यमान आहेत. आजही त्यांची समाधीस्थळे अनेक युवकांना, तरुणांना, प्रवचनकारांना, कीर्तनकारांना, व्यावसायिकांना प्रेरणा देत आहेत.
श्रीसंत तुकडोजी महाराजांना ११५व्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...
 
डॉ. सुनील भंडगे 
(लेखक माजी अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आहेत.)