योगिक-निर्भयता व पर्याप्तता (लेखांक-३)

    29-Apr-2024
Total Views |
 YOGA
 
‘ॐ सूर्याय नम:’ - सूर्यदेव आपणांस अविरत, निर्भयपणे, भगवद्प्रीत्यर्थ स्वधर्म कर्म करण्यासाठीची प्रकाशमय शक्ती व बुद्धी देवो, जेणेकरून शांती प्राप्त होईल.
 
अस्तेय तिसरा यम - निर्भयता प्राप्त होण्यास अस्तेय पालन करणे गरजेचे आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. चोरी न करणे, ही कला आहे व कुठलीही कला ही प्रयत्नाने शिकावी लागते. चोरी करणे ही वृत्ती मनुष्यात उपजतच असते. कसे म्हणाल तर, साधे उदाहरण बघूया. दोन छोटी बाळे एके ठिकाणी झोपवा आणी एकाच्याच हाती रंगीत हलका बॉल ध्या, दुसर्याला देऊ नका. तो दुसरा बाळ काय करतो, ते बघा. काय करेल? एक तर तो बॉल हिस्कावेल किंवा जोरजोराने हातपाय फिरवत ओरडेल.
 
मनुष्य काय चोरतो, तर पहिली चोरी दुसर्याचे विचार आपलेच म्हणून प्रकट करतो.स्वत:चा मोठेपणा सिद्ध करायला. दुसर्याचे विचार सांगू नये असे नाही, पण त्यावेळी त्याचे नाव उद्धृत करा, ज्यांचे हे विचार आहेत. म्हणजे ती विचारांची चोरी होणार नाही. दुसरी चोरी ही वस्तूंची. आपल्याकडे ती वस्तू नाही, मग इतरांची वस्तू हिसकावून घेणे किंवा चोरणे. जसे आपण आता बॉलचे उदाहरण बघितले. तिसरी चोरी धनाची. जी आज सर्रासपणे होते आहे. वाममार्गाने, भ्रष्टाचार करून धन कमावणे, ज्याला आपले वेदशास्त्र ‘अलक्ष्मी’ असे संबोधते आणि आपल्याला सूचविते की, ‘अलक्ष्मीं नाशयाम्यहम्.’ कारण, अशी अलक्ष्मी घरात आली, तर ती चार चैनीच्या वस्तू घरात आणेल.
 
पण, सुख, समाधान आणि शांती हिरावून घेईल. कारण, हे संपूर्ण ब्रह्मांड स्पंदनावर चालतं आणि अशा अलक्ष्मीतून अर्जित वस्तू सर्व नकारात्मक व शापित स्पंदने सोडत राहतं, ज्यामुळे आपलं, आपल्या कुटुंबाचं कल्याण होऊ शकत नाही. चमकधमक तेवढी दिसणार तिला ‘सूज’ म्हणतात, ‘वाढ’ म्हणत नाही. चौथी चोरी स्त्री-पुरुष, दुसर्याची स्त्री, दुसर्याचा पुरुष यांची अभिलाषा मनात न बाळगणे. संत रामदास ‘मनाच्या श्लोकां’त असा उपदेश करतात की, ‘॥पर द्रव्य आणि कांता परावी। येदर्थी मना सांडी जीवे करावी॥’ आताच्या समान हक्काच्या युगात त्यांनी काही वेगळं लिहिलं असतं. पाचवी चोरी वेळ/समय चोरी. ठरावीक वेळेतच काम पूर्ण करायचे असते, त्याऐवजी जास्त वेळ घेणे.
 
अस्तेय पालन न केल्यामुळे मनात भय/ अपराधीपणाची भावना निर्माण होते. मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते, जी मानसिक व शारीरिक रोगांना आमंत्रण देते. जशी शारीरिक-मानसिक आणि वाचिक अहिंसा पालन केल्याने निर्वेरता प्राप्त होते, तसे अस्तेय पालन केल्याने तिसरा सद्गुण निर्भयता प्राप्त होते. अपरिग्रह चौथा यम - भारताच्या योगशास्त्रीय संकल्पनेतून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश आला आहे, तो म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह याचा अर्थ आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंचा साधनांचा संग्रह करु नये. भौतिक, उपभोग्य वस्तूंचा परिग्रह (परिग्रह म्हणजे एकत्र करणे, तृष्णा करणे, शोधणे, जप्त करणे आणि इतरांकडून भौतिक संपत्ती किंवा भेटवस्तू प्राप्त करणे किंवा स्वीकारणे) हा योगमार्गातील अडसर ठरू शकतो. यासाठी केवळ स्वत:च्या, कुटुंबाच्या धारणेस अत्यावश्यक वस्तूंचाच संग्रह करावा. कारण, योग ही जीवनशैली प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे.
 
अपरिग्रह साधल्याने हळूहळू उपभोगाच्या साधनांविषयी अनासक्त भाव निर्माण होतो व उपभोगाची साधनांवषयी आपल्या मनात वैराग्य निर्माण होते. तेव्हाच आपण स्वत:कडे त्रयस्थपणे पाहू लागतो व मनातल्या आसक्ती विषयी स्वत:कडे बघून हसतो.
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥
(श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६ श्लोक १०)
अर्थ : मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणार्या निरिच्छ आणि संग्रह न करणार्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. म्हणजेच एकांतात राहून अपरिग्रहाचे पालन करीत, मन स्थिर ठेवावे व साधना करावी, असे म्हटले आहे.
 
अपरिग्रहाचे पालन केल्यास वर्तमान आणि भविष्यकाळातील समाजातील साधनसंपत्ती विषयक समता प्रस्थापित करण्यासाठी काहीअंशी आपण मदतगार होऊ शकते. आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह केल्याने आपण इतरांना त्यांच्या गरजांपासून वंचित ठेवण्याचा सामाजिक अपराध करतो. अपरिग्रहाचे पालन केल्यास आपला लाभ काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तर पर्याप्ततेची भावना निर्माण होऊन समाधानी वृत्ती राहते. म्हणून निष्कारण आपल्या गरजा वाढवून ऐहिक पसारा वाढवू नये.
(क्रमशः)
 
डॉ. गजानन जोग 
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५