नव्वदीची फेक आणि गोल द्वादशी

    28-Apr-2024
Total Views |
 HOCAKY
 
 
भालाफेक हा प्रकार गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून भारतींयाच्या आवडीचा खेळ झाला कारण निरज चोप्रा याचे दैदिप्यमान यश हेच होते. पण हा खेळ नेमका काय आहे ? त्याचा इतिहास काय आहे? तर भारताच्या हॉकीचे स्वप्न याबाबात अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया...
 
आपण बुधवार, दि. १७ एप्रिलच्या रात्रौ पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या उद्घाटनाच्या उलट गणतीचे शतक मोजले. त्यावेळेस आपण भारताचा ऑलिंपिक भालाफेकपटू नीरज चौप्रा हा पॅरिस २०२४चा ध्वजवाहक का नसेल, ह्याचे कारण समजून घेतले. त्या शतकी गणनेच्या काळातच नीरज चौप्रा हा नेमका आपली भालाफेकेच्या मीटरची नव्वदी गाठायच्या किंवा ओलांडायच्या सरावात मग्न असेल.
 
नीरज चौप्राला ८९.९४ मीटर हा व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ आणि भारताच्या राष्ट्रीय विक्रमाचा आकडा पार करावयाचा आहे. मनाचा निग्रह केला, तर नीरज चौप्रा त्या मीटरची नव्वदीही गाठू शकतो. त्यासाठी, आपण सारे भारतीय आपल्या सकारात्मक ऊर्जेसहित, असलेल्या शुभेच्छा देत त्याला मदत कशी करता येईल, हे बघत आहोत.
 
पॅरिस ऑलिंपिक २०२४च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला हमखास पदक मिळू शकेल, असा नीरज चौप्राचा क्रीडाप्रकार म्हणजे भालाफेक. आता आपण नीरज चौप्रामुळे, सगळ्यांच्या मुखी झालेल्या भालाफेक या क्रीडाप्रकाराच्या ऑलिंपिक इतिहासावर एक नजर टाकू.
 
इ. स. १९०८च्या ऑलिंपिकमध्ये पुरुषांसाठी भालाफेक क्रीडाप्रकार समाविष्ट झाला,तर महिलांसाठी १९३२मध्ये. तत्पूर्वीच, भाला शिकारीत आणि युद्धात सर्रासपणे वापरला जात असे. इ. स. पूर्व ७०८ या कालखंडात ग्रीसमध्ये भालाफेक हा क्रीडाप्रकार प्रथमच दिसून आला. धावणे, डिस्क थ्रो अर्थात थाळी फेक, लांब उडी आणि मल्लयुद्ध यांसह भालाफेक हा खेळ पाच क्रीडा प्रकारांचा एक समूह म्हणून ओळखल्या जाणार्या, ‘पेंटॅथलॉन’मधील एक भाग म्हणून खेळला जात असे. पेंटॅथलॉन या क्रीडाप्रकारात प्रत्येक स्पर्धकाला या पाच स्पर्धेत भाग घ्यावा लागत असे.
 
ऑलिव्ह तेल ज्यापासून काढतात, त्या ऑलिव्ह वृक्षाच्या लाकडापासून ते भाले बनविले जात. प्राचीन ऑलिंपिक खेळांचे ठिकाण असलेल्या ऑलिंपियाची स्थिती अनेक शतकांपासून अनेक लढाया आणि नैसर्गिक आपत्तींनंतर विस्कळीत झाली होती. रोमन सम्राट पहिला थिओडोसियस याने मूर्तिपूजक उत्सव आणि कार्ये बेकायदेशीर ठरवल्यानंतर, इ. स. ३९४ (लॅटिन शब्द न्नो डोमिनी) अर्थात ख्रिस्तजन्मानंतरच्या कालगणनेच्या सुमारास ते खेळ अधिकृतपणे संपुष्टात आले. यामुळे, एक खेळ म्हणून भाला उडविण्याची प्रथाही संपुष्टात आली.
 
शतकांनंतर, डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडनचा समावेश असलेल्या उत्तर युरोपीय देशांच्या गटाला ओळखले जाते, त्या स्कँडिनेव्हियन लोकांनी १७००च्या उत्तरार्धात भालाफेक ह्या खेळाचे पुनरुज्जीवन केले. नवसंजीवनी प्राप्त झालेल्या त्या क्रीडाप्रकारात लक्ष्यावर भाला फेकणे आणि सर्वात लांबवर भाला फेकणे, असे दोन प्रकार होऊ लागले. तथापि, कालौघात, अंतरासाठी भाला फेकणे हा अधिक लोकप्रिय प्रकार प्रचलित झाला.
 
भालाफेक या खेळात वर्चस्व गाजविणारा पहिला खेळाडू स्वीडनचा एरिक लेमिंग हा होता. या स्वीडिश क्रीडापटूने फेकणे आणि उडी मारणे अशा क्रीडाप्रकारात एक दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजविले होते. १८९६च्या आधुनिक ऑलिंपिकमध्ये इतर फेकींच्या क्रीडाप्रकारातील थाळीफेक आणि गोळाफेक यांचा जरी समावेश करण्यात आला असला, तरी १९०८मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिकच्या तिसर्या आवृत्तीपासून भालाफेक या मैदानी क्रीडाप्रकाराने ऑलिंपिक स्पर्धेत स्थान मिळविले.
 
स्वीडनच्या क्रीडापटूंनी स्टँडर्ड भालाफेकीत, तसेच फ्रीस्टाईल भालाफेकीत सुवर्णपदके जिंकली, स्वीडनच्या एरिक लेमिंगने स्टँडर्ड प्रकारात ५४.४८२ मीटर भालाफेक करून एक नवीन जागतिक आणि ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित केला.
फ्रीस्टाइल प्रकारात भाला पकडताना तो मध्यभागी पकडण्याऐवजी तो कुठेही धरता येतो. लंडन ऑलिंपिक १९०८ हे ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल भालाफेकीचे पहिले आणि एकमेव सामने होते. स्वीडनच्या एरिक लेमिंगने १९१२च्या ऑलिंपिकमध्ये तसेच स्वीडनमधील त्याच्या घरच्या प्रेक्षकांसमोर भाग घेतला. तेथे, त्याने इतिहास रचत ६० मीटरचा टप्पा पार करून, स्टँडर्ड फेकीत सलग दुसरे सुवर्ण जिंकून आणखी एक विक्रम प्रस्थापित केला.
 
कालांतराने पुढे भालाफेक हळूहळू लोकप्रिय होऊ लागली आणि ते वर्चस्व डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड अशा उत्तर युरोप आणि उत्तर अटलांटिक नॉर्डिक राष्ट्रांपासून मध्य युरोपकडे सरकले. बघताबघता, भाला बनविण्यासाठी नवीन, हलक्या साहित्याच्या आगमनाने पहिल्या ऑलिंपिकपेक्षा हे अंतर जवळजवळ दुप्पट झाले. १०० मीटरचा टप्पा ओलांडून भालाफेक करणारा जर्मन भालाफेकपटू उवे होन हा पहिला खेळाडू होता आणि असे करणारा तो एकमेव राहिला. १९८४ मध्ये, जर्मन भालाफेकपटू उवे होन याने बर्लिनमध्ये १०४.८ मीटरचा एक अत्यंत विलक्षण आकडा नोंदविला. टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये नीरज चोप्राचे मुख्य प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ हे जर्मनीचेच होत. आणि डॉ. क्लॉस बार्टोनिट्झ यांची शिफारस करणारा माजी ऑलिंपिक भालाफेक विजेता असलेला उवे होन हादेखील जर्मनीचाच होता.
 
तथापि, भाल्याच्या रचनेत बदल झाल्यानंतर १९८६ मध्ये रेकॉर्ड पुन्हा सेट केले गेले, ज्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण केंद्र पुढे सरकले. या हालचालीमुळे अंतर कमी झाले आणि स्टेडियममधील उपलब्ध जागेच्या पलीकडे फेकण्याचा धोका कमी झाला.
१९९९ मध्ये महिलांच्या भालाफेकीतही असाच बदल पाहायला मिळाला. तीन वेळा ऑलिंपिक पदक विजेते स्टीव्ह बॅकलेने १९९२ मध्ये ९१.४६ मीटरपर्यंत फेकले, नव्याने तयार केलेल्या भाल्याने पहिल्या काही वर्षांत ९० मीटरचा टप्पा ओलांडणे कठीण केले. तथापि, जॅन झेलेझनी याला हा विक्रम काही अंतराने मोडायला वेळ लागला नाही.
 
चेक प्रजासत्ताकचा झेलेझनी, १९९०च्या दशकात सर्वात मोठा भाला फेकणारा म्हणून ओळखला जातो. वाटेत त्याने तीन विश्वविक्रम रचले, तीन सलग ऑलिम्पिक सुवर्ण (१९९२, १९९६, २०००) आणि तीन जागतिक विजेतेपद (१९९३, १९९५, २००१) जिंकले. १९९६ मध्ये जॅन झेलेझनी यांचा ९८.४८ मीटरचा प्रयत्न अजूनही कायम आहे. भालाफेकचा विश्वविक्रम त्याने आपल्या शानदार कारकिर्दीत ९५ मीटरचा अडथळाही तीनदा पार केला. अगदी अलीकडे, २०१७चा विश्वविजेता जर्मनीचा जोहान्स वेटर हा मैलाच्या दगडाजवळ आला आहे, २०२१ मध्ये ९७.७६ मीटर पर्यंत पोहोचला आहे आणि नऊ वेळा त्याने नव्वदीची फेक पार केली आहे.
 
ऑलिंपिक भालाफेकीच्या इतिहासावर दृष्टीक्षेप घालताना माझ्या डोळ्यासमोर तरळतात क्रिशन निरंजन तथा के.एन. सिंग याचे डोळे. आकाशवाणीच्या विविध भारतीमध्ये त्यांच्या एक मुलाखतीत ते सांगत होते की, बर्लिन ऑलिंपिकसाठी भालाफेक या क्रीडाप्रकारात त्यांची निवड करण्यात आली होती, पण दुर्दैवाने त्यांच्या बहिणीच्या तब्येतीमुळे त्यांचे ऑलिंपिक हुकले होते. मैदानी खेळांत आणि भारोत्तोलन यातही ते वाकबगार होते. जर्मनीतील भालाफेकपटूंनी केलेली कामगिरी बघितली, तर आपला एकटा नीरज चौप्रा कष्ट करत, आधी आपले मग देशाचे आकडे गाठत जर्मनीला टक्कर देताना पाहिला की त्याचा आपल्याला अभिमान तर वाटतोच. पण त्याचबरोबर आपण असे नीरज चौप्रा घडवायचे असतील, तर आपल्याला अजून किती लांबचा पल्ला गाठायचा आहे, ते कळते. आणि मग जसे स्वीडीश मागे पडून जर्मन पुढे आले, तसे मग जर्मन मागे पडलेले बघून भारत यादेखील क्रीडाप्रकारात अग्रेसर झालेला बघायला मग आपल्याला का बरे आवडणार नाही! गरज असेल ती फक्त नव्वदीच्या ध्येयाची.
  
जी नव्वदी एकट्या नीरज चौप्राला पार करायची आहे, तशी गोल द्वादशी आता आपल्या हॉकीपटूंना साजरी करावयाची आहे. जेंव्हा आपण पॅरिस ऑलिंपिक २०२४च्या उद्घाटनाच्या उलट गणतीचे शतक मोजत होतो. त्याच सुमारास, भारताचे हॉकीपटू आजपर्यंत ऑलिंपिकमध्ये मिळविलेल्या हॉकीच्या पदकांचची द्वादशी कशी पार करायची, याचा विचार करत करत ऑलिंपिकमध्ये आपल्याला टक्कर देणार्या ऑस्ट्रेलियन संघाशी पाच सामन्यांची मालिका खेळून दि. १७ एप्रिल २०२४लाच परतले होते. टोकियो २०२० ऑलिंपिकचे कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय संघाची नजर आता अंतिम पारितोषिकावर आहे, ते म्हणजे सुवर्णपदक. नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जर्मन, इंग्लंड आणि मग भारत अशा पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत आज हॉकीचे चित्र आहे. हे चित्रही हॉकीपटूंना आता बदलायचे आहे. ही आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतासमोर मोठे आव्हान आहे.
 
ऑस्ट्रेलिया (जागतिक क्रमांक ३), अर्जेंटिना (जागतिक क्रमांक ७), न्यूझीलंड (जागतिक क्रमांक १०) आणि आयर्लंड (जागतिक क्रमांक १२) यांसारख्या तगड्या स्पर्धकांसह विद्यमान ऑलिंपिक चॅम्पियन बेल्जियम (जागतिक क्रमांक २) त्यांच्या मार्गात उभे आहेत. उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी ब गटात किमान ‘टॉप-टू फिनिश’ मिळविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, गट ‘ए’ मध्ये जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान फ्रान्ससह जगातील अव्वल क्रमांकाचा संघ, नेदरलँड्स यांचा समावेश आहे, पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये १२ संघ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत तीव्र लढाईसाठी सज्ज आहेत.
 
आम्ही नुकतेच ऑस्ट्रेलिया दौर्यावरून परतलो, थोड्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा कंबर कसू. पॅरिस ऑलिंपिकला केवळ १०० दिवस उरले असताना, संघातील आमचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. सुवर्णपदक जिंकण्याच्या आमच्या सामायिक ध्येयामुळे आमच्या संघाची एकता वाढतच चालली आहे. क्रेग फुल्टन, आमचे मुख्य प्रशिक्षक, आमच्या साप्ताहिक वेळापत्रकात ऑलिंपिक काउंटडाउनसह आमच्याकडे लक्ष ठेऊन असतील. एकंदरीत, आम्हाला भूक लागली आहे, आमचे लक्ष केंद्रित आहे आणि आम्ही चमकण्यासाठी तयार आहोत. भारतीय पुरुष हॉकी संघाचा सध्याचा कर्णधार हरमनप्रीत आपले विचार मांडताना तेव्हा हे सांगत होता. उपकर्णधार हार्दिक सिंगनेही सांगितले की, “ऑस्ट्रेलिया दौर्याने आम्हांला सुधारण्याची गरज असलेली क्षेत्र दाखवली आहेत. , आणि आम्ही शिबिरात परतल्यावर आम्ही उर्वरित समस्या सोडविण्याचे आमचे ध्येय आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकासाठीचा आमचा प्रयत्न यशस्वी होईल, याची खात्री करण्यासाठी आम्ही उर्वरित १०० दिवसांपैकी प्रत्येक दिवशी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.”
 
भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिक २०२४च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या आधी द्वादशी साजरी केली आहे. आता पॅरिसमधील स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य पदक प्राप्त केले. तर आपण सारे द्वादशी पार केल्याचा आनंद व्यक्त करणार आहोत. त्यासाठी, मला गौरीपुत्र विनायकाचे एक नित्यपाठातले ‘प्रणंम्य’ हे स्तोत्र आठवते. त्यात वक्रतुंडाची द्वादश म्हणजे बारा नावाचे वर्णन आहे. ऑलिंपिक हॉकीत भारताने आजपावेतो बारा पदके मिळविली आहेत. ती द्वादश नावे आठवत आगामी ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकीपटू त्यात काय तेराव्या पदकाची भर घालेल का! त्यासाठी हे स्तोत्र मला म्हणावेसे वाटते.
 
प्रथमं सुवर्ण १९२८ एम्स्टरडॅमचं ।
लॉसएंजलिस १९३२ सुवर्ण द्वितीयकम् ।
तृतीयं सुवर्ण बर्लिनं १९३६ ।
सुवर्ण लंडने १९४८ चतुर्थकम् ।
हेलसिंकीस्य सुवर्ण १९५२ पञ्चमं च ।
षष्ठं मेलबर्न १९५६ सुवर्ण च ।
सप्तमं १९६० रोमस्य रौप्यं ।
१९६४ टोकियो सुवर्णवर्णं तथाष्टमम् ।
नवमं १९६८ मेक्सिको कांस्यं च ।
दशमं कांस्यं ते १९७२ म्युनिक: ।
एकादशं १९८० मॉस्कोस्य सुवर्णपदका ।
द्वादशं तु २०२१ टोकियो कांस्यपदकम् ।
द्वादशैतानि पदकांनी त्रिसंध्यं य: पठेन्नर: ॥
 
१९२८च्या सुवर्णपदकांपासून ते २०२१च्या पदकांपर्यंतच्या द्वादश ऑलिंपिक हॉकीचा प्रवास उलगडणारे हे स्तोत्ररुपी प्रकटन आपण आत्ता जपले. सदर स्तोत्रात भारतीय हॉकीपटू अजून एक मणी ओवण्याच्या तयारीत आहेत. तो मणी कांस्याहून श्रेष्ठ असलेल्या रौप्याचा अन् त्याहूनही श्रेष्ठतम असणार्या सुवर्णाचा असावा. सध्या बेंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साई येथील केंद्रात चालणार्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी २८ सदस्यीय संभाव्य गटाची घोषणा झालेली आहे. त्या शिबिरार्थींचा ‘त्रिसंध्यं यः’ असा सराव करणार्याना यश प्राप्त होवो, ही आपल्या सगळ्यांची असलेली मनोमन शुभकामना आपण आपल्या हॉकीपटूंना देत बाकी सगळ्या भारतीय ऑलिंपिकचमूला आशीर्वाद देत ‘पदकंफलप्राप्ती’साठी म्हणू ‘सर्वसिद्धिकरं प्रभो’. गणपती बाप्पा मोरया.
 
श्रीपाद पेंडसे 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत )
९४२२०३१७०४