इतिहासच्या पाऊलखुणा....

    27-Apr-2024
Total Views |
Vasudev Balwant Phadke's Mansion in Shirdhon

एव्हाना मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. अशावेळी पालकांनी विशेषकरुन शनिवार-रविवारी मुलांना चित्रपट किंवा मॉलमध्ये घेऊन जाण्यापेक्षा, ऐतिहासिक स्थळांची भेट घडविणेही सर्वार्थाने तितकेच महत्त्वाचे ठरावे. असेच एक पावन स्थळ म्हणजे शिरढोण, पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके वाडा. या वाड्याच्या भेटीनंतर पार्थ भगरे या तरुणाने शब्दबद्ध केलेले हे अनुभव...

कशास आई भिजवीसी डोळे
सोसू किती तुझे हाल
रात्रीच्या गर्भात उद्या असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटताच प्रेते
उठतील ज्वालांमधूनी
भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले
घळाघळा तुटणार,
आज घळाघळा तुटणार गर्जा जयजयकार क्रांतीचा,
गर्जा जयजयकार!
 
हे गीत एका क्रांतिवीराच्या चित्रपटातील असून, हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा तेव्हा मला आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाची प्रकर्षाने आठवण येते. मागच्याच रविवारी मी अशाच एका क्रांतिकारकांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि ते क्रांतिकारक म्हणजे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे पनवेलमधील शिरढोण येथील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके! मी गेलो तेव्हा वाड्याची आणि वाड्याच्या आजूबाजूच्या परिसराची डागडुजी सुरू होती. त्यामुळे वाडा बाहेरूनच बघावा लागला. पण, त्या काळातली वाडे बांधण्याची संस्कृती बघून खूप आश्चर्य वाटले. वाड्याचे लोखंडी गजांचे प्रवेशद्वार, वाड्याबाहेर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दिवे ठेवण्यासाठी केलेली जागा आणि वाड्याच्या अंगणातील तुळस आणि शिवलिंगाने माझे मन वेधून घेतले.
 
अशा या महान क्रांतिकारकाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेलमधील शिरढोण गावी दि. ४ नोव्हेंबर १८४५ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे कर्नाळा प्रांताचे किल्लेदार होते. लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारीचे, तलवारबाजीचे, कुस्तीचे शिक्षण मिळाले. त्यांच्या माध्यमिक शिक्षणानंतर ते पुण्यास आले आणि सदाशिव पेठेत इंग्रज सरकारच्या लष्करी लेख सेवेत नोकरीस रुजू झाले. लहुजी उस्ताद आणि गोविंद रानडे यांच्या प्रभावानंतर इंग्रजांच्या आर्थिक धोरणांबाबत फडके गुरुजींना कळले. या गोर्‍यांच्या साम्राज्यात सूर्य कधी मावळत नाही, हे गोर्‍यांनी त्यांना दाखवून दिलेच! आपल्या अंथरुणाला खिळलेल्या आईला भेटण्यासाठी त्यांनी इंग्रजांकडे रजा मागितली असता, त्या इंग्रज अधिकार्‍याने त्यांना रजा नामंजूर केली आणि रजा मिळेपर्यंत त्यांच्या आईची प्राणज्योत मावळली होती. त्यानंतर संतप्त फडके गुरुजींनी इंग्रजांची नोकरी सोडून दिली आणि त्यांच्या जाचक धोरणांविरुद्ध भाषणे देण्यास सुरुवात केली. इसवी सन १८७० मध्ये दुष्काळग्रस्त लोकांकडे इंग्रज सरकारने कानाडोळा केला, तेव्हा वासुदेव फडके यांनी स्वतः तेथील लोकांना मदत केली आणि इथूनच त्यांच्या सशस्त्र क्रांतीला सुरुवात झाली.

दौलतराव नाईक यांच्या मदतीने त्यांनी लोणी, धामारी या गावांवर पहिला दरोडा घातला. त्यानंतर लोणी-खेड या गावांवर दरोडा टाकून लुटमार केली. त्यानंतर जेजुरीजवळ वेल्हे या ठिकाणी घातलेल्या दरोड्यात त्यांनी चार बंदुका, शंभर रुपये, कापड आणि खजिन्याची पेटी लुटली. त्यांनतर फडके गुरुजींना मातंग, रामोशी, धनगर इत्यादी जातीतील लोक मिळाले. त्यानंतर खेड शिरूर तालुक्यात त्यांनी इंग्रज सरकारच्या खजिन्यावर दरोडा टाकून लुटमार केली. त्यांच्या या क्रांतीस इंग्रज सरकारने पोरखेळ असे समजून त्यांना पकडण्यासाठी इनाम जाहीर केले. भारतातील हा पहिला सशस्त्र क्रांतीचा उठाव मोडून काढण्याचा चंग इंग्रज सरकारने बांधला. फडके गुरुजींना या लढाईत अरब आणि रोहील्यांकडून सुद्धा मदत मिळाली. वासुदेव फडके यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारला हैदराबादच्या निजामाने मदत केली आणि त्याच्या सेवेत असलेला अब्दुल हक आणि इंग्रज अधिकारी रिचर्ड टेंपल याने मेजर हेनरी विल्यम डॅनियल या इंग्रज अधिकार्‍याला फडके गुरुजींना जीवंत पकडण्यासाठी पाठवले. शेवटी फितुरी तर आपल्या पाचवीला पुजलेलीच!

दि. २२ जुलै १८७९ रोजी विजापूर येथील देवर नावडगी तालुक्यातील एका बौद्ध विहारात फडके गुरुजी गाढ झोपेत असताना इंग्रज सरकारने त्यांना झोपेतच साखळदंडात जेरबंद केले आणि पुण्यास आणले व तेथे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. परंतु, एकही वकील त्यांचे वकीलपत्र घेण्यास धजावला नाही आणि यामुळे पुण्यातील गणेश वासुदेव जोशी म्हणजे ‘सार्वजनिक काका’ यांनी त्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उच्च न्यायालयात महादेव चिमणाजी आपटे यांनी त्यांचा चाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इंग्रज सरकारने फडके गुरुजींना फाशीची शिक्षा फेटाळून आजन्म कारावासाची शिक्षा दिली, जेणेकरून भारतीय जनतेच्या मनातून फडके गुरुजींची प्रतिमा कायमची पुसली जाईल आणि तसे झाले नाही तर ते राष्ट्राचे प्रतीक म्हणून ओळखले जातील, या भीतीने फडके गुरुजींना येमेन येथील एडनच्या तुरुंगात पाठविण्यात आले. दि. ३ जानेवारी १८८० रोजी ‘तेहरान’ नावाच्या बोटीने एडनसाठी मुंबईचा किनारा सोडला. तेथून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्यात इंग्रजांनी त्यांचे एडनच्या तुरुंगात अतोनात हाल केले आणि अखेरीस क्षयाची शिकार होऊन दि. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी ‘वासुदेव बळवंत फडके’ नावाचे वादळ शांत झाले.

मी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी विविध उपक्रमात सहभाग घेतो तसेच त्यासाठी कार्य करतो. दि. ३१ मार्च रोजी आम्ही याच वाड्यात एक ऐतिहासिक कट्टा घेतला आणि त्या कट्ट्याचा विषय होता ’वेड’! यामध्ये युवा तरुण-तरुणींनी लेख, कथा, कविता आणि नाट्य उतार्‍यांचे अभिवाचन करून आपले ‘वेड’ व्यक्त केले.आज त्यांच्या वाड्याच्या बाजूला च असलेल्या त्यांच्या स्मारकामधील माहिती वाचताना डोळ्यात अश्रू तर आलेच, शिवाय अंगात देशकार्यासाठी बलिदान देण्याचा धगधगता अंगार पेटून उठला! त्यांच्या वाड्यालगतच फडके यांचे एक छोटे स्मृतिदालन उभारण्यात आले आहे, जिथे त्यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणी दिलेली बोकडाची गाडी, तसेच त्यांनी लिहिलेल्या गुरुचरित्र ग्रंथाची प्रत, त्यांची ध्यानस्थ मूर्ती आणि एडनच्या तुरुंगातील त्यांची साखळदंडात जेरबंद असलेली जेलची प्रतिकृती, शिवाय त्यांना ज्या साखळदंडात जेरबंद केले होते, ते साखळदंडसुद्धा बघावयास मिळतात..

तसेच त्यांच्या जीवनाची आणि त्यांच्या कार्याची माहिती वाचायला मिळते. शिवाय एका दालनात त्यांची हातात शस्त्र धारण केलेली मूर्तीदेखील पाहायला मिळते. ज्या मूर्तीकडे पाहताना मला असं वाटतं होतं की, फडके गुरुजी अजूनही जीवंत आहेत या वास्तूमध्ये! वाडा आणि स्मृतिदालन पाहून भरुन आले. माझा पाय तिथून निघत नव्हता. मी त्या सगळ्या गोष्टी पाहून इतका भारावून गेलो होतो की, मला दुपारचे ४ कधी वाजले तेच कळले नाही. त्यांच्या वाड्याच्या आणि स्मृतिदालनाच्या काही गोड आठवणी मी या लेखामध्ये जोडत आहे! खरंच फडके गुरुजींसारखा एक प्रभावी नेता माझ्याच नव्हे, तर माझ्या पुढील पिढीला देखील देशकार्यासाठी नक्कीच प्रेरणा देत राहील!

पार्थ भगरे