व्यापारी जहाजांवरील नाविकांच्या सुरक्षेचे आव्हान आणि उपाययोजना

    27-Apr-2024
Total Views |
Safety of Indian seafarers


एका प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे ४०० पेक्षा जास्त भारतीय नाविकांना त्यांच्या कंपन्यांनी, वार्‍यावर धोकादायक परिस्थितीमध्ये सोडून दिलेले आहे. त्यांना सोडवणे महत्त्वाचे आहे.

इराणने जप्त केलेल्या कंटेनर जहाज ’चडउ ईळशी’ वरील भारतीय महिला कॅडेट केरळमधील सुश्री न टेसा जोसेफ, दि. १८ एप्रिलला भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे सुखरूप भारतात परत आली. बाकीचे भारतीय क्रू अजून तिथे अडकलेले आहेत. सोडलेल्या खलाशांची संख्यादेखील वाढत आहे. आठवत असेल की, ‘एम. व्ही. डाली’ जहाजाने बाल्टिमोर शहरांमध्ये, तिथल्या एका पुलाला धडक मारली. ते जहाज गेल्या चार आठवड्यांपासून तिथेच अडकले आहे. जहाजावरील नाविकांना केव्हा बाहेर काढण्यात येईल, याविषयी काहीही सांगू शकत नाही. दि. ६ मार्च रोजी, हौथींच्या क्षेपणास्त्राने बार्बाडोस-ध्वजांकित व्यापारी जहाज ‘ट्रू कॉन्फिडन्स’वरील तीन क्रू सदस्य ठार, दोघे गंभीर जखमी झाले. विविध युद्धे आणि अनेक कारणांमुळे नाविकांना-खलाशांना वेगळ्या प्रकारचा त्रास होत आहे. त्यांचे मालक त्यांना आणि त्यांच्या जहाजांना बेवारस सोडून देत आहेत. या सोडलेल्या खलाशांची संख्या सतत वाढत असल्याने, जगाने त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष देणे, तपासात मदत करणे आवश्यक आहे.

दि. १८ डिसेंबर रोजी, सिएरा लिओनचा ध्वज असलेल्या ‘ग्रँड सनी’ या मालवाहू जहाजावर काम करणार्‍या खलाशांना कळले की, ते चीनच्या नान्शा बंदरात अडकून पडले आहेत. जहाजाचा मालक, ‘थाऊजंड स्टार इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीबद्दल कोणतीही माहिती नाही. इटलीच्या मेसिना बंदरात, अनेक नाविक तीन वर्षांपासून कॅमेरूनच्या ध्वजांकित मालवाहू जहाजावर अडकून पडले आहेत. सागरी नियमांनुसार, अगदी कठीण काळात आलेल्या जहाजमालकांनाही त्यांची जहाजे आणि कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची परवानगी नाही. परंतु, बरेचजण आर्थिक फायद्याकरिता दुर्लक्ष करतात. ‘आयटी’च्या अहवालानुसार, २०२३ साली त्यांच्या मालकांनी १३२ जहाजे बेवारस सोडली होती. ती २०२२च्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढली आहे. अनेक जहाज मालक जुन्या आणि खराब देखभाल केलेल्या जहाजांसह आणि वारंवार ध्वज नोंदणी बदलतात, ज्यामुळे कायदे तोडल्यानंतर त्यांना लपणे सोपे होते. यात १ हजार, ४०० जहाजांचा समावेश आहे. गॅबॉन या देशाचे आपण नाव फारसे ऐकले नाही. हे जगातील सर्वात मोठे ध्वज राज्य कसे असू शकते? आज, गॅबोनीज ध्वजाखाली जाणारी ९८ टक्के जहाजे उच्चजोखीम मानली जातात. गॅबोनीज ध्वजाखाली जाणारे जहाज मालक शोधणे जवळजवळ अशक्य आहे.

DG शिपिंग, फॉरेन मिनिस्ट्री, कायदा मिनिस्ट्री यांची एकत्रित कारवाई जरूरी  अनेक वेळा व्यापारी जहाजांना वेगवेगळ्या बंदरात त्यांनी पैसे न भरल्यामुळे किंवा इतर आर्थिक कारणांमुळे अटक होते. अशी अटक झालेली अनेक जहाजे, आज अनेक देशांच्या बंदरामध्ये असतात. तुर्कस्तानमध्ये अंबरली बंदरामध्ये ‘फत्मा युलूल’ नावाचे जहाज अडकले आहे, ज्यामध्ये १२ भारतीय नाविक आहेत. ते त्या बंदरात जहाजावर खुल्या तुरूंगामध्ये आहेत. अशा जहाजांचे कर्मचारी ‘डायरेक्टर जनरल, शिपिंग’ला पत्र लिहून, ईमेल करून किंवा फोन कॉल करून आपल्या परिस्थितीची माहिती देतात. परंतु, ‘डायरेक्ट जनरल, शिपिंग’ करून होणारी कारवाई अत्यंत ढिली असते. अनेक वेळा दुसर्‍या देशांच्या कायद्यामध्ये अडकले असल्यामुळे, आपल्या नाविकांना तेथून बाहेर काढण्याकरिता ‘डायरेक्ट जनरल, शिपिंग’, विदेश मंत्रालय, कायदा मंत्रालय या सगळ्यांची एकत्रित कारवाईची गरज असते, जे वेगाने होत नाही. ‘मॅरीटाईम लेबर कन्वेन्शनल २००६’च्या कायद्याप्रमाणे नाविकांना बेवारस सोडून दिले (abandonment) हे तेव्हा म्हटले जाते, जेव्हा नाविकांना त्यांचा पगार मिळत नाही किंवा परत जाण्याकरिता हवाई तिकीट मिळत नाही.

असेच एक जहाज ‘एम. व्ही. अरझक मोइन’ हे युएईमध्ये तीन वर्षांहून जास्त काळ अडकले होते. तेथील नाविकांना, ज्यामध्ये १२ भारतीय होते, पगार मिळत नव्हता, जेवणाखाण्याचीसुद्धा व्यवस्था नव्हती. एका मोठ्या कायद्याच्या लढाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. ‘एमटी तमिन’ नावाचे जहाज शार्जामध्ये दोन वर्षे अडकले होते. त्यांना शेवटी भारताच्या विदेशी मंत्रालयाने सोडवले. अशा प्रकारे नाविकांना कैदेत टाकणे, त्यांच्या मानवी अधिकाराचा भंग करणे आहे. एका अजून प्रसंगामध्ये दोन भारतीय नागरिक ‘एम. व्ही. तमिळ’ या जहाजावरून लाईफ बोटीच्या मदतीने सुटले. या जहाजाला त्यांच्या मालकांनी जुने झाल्यामुळे समुद्रात सोडून दिले होते. जुनी जहाजे एखाद्या बंदरामध्ये ठेवणे किंवा विकणे हे अनेक वेळा आर्थिक दृष्टीने परवडण्यासारखे नसते. म्हणून, जसे काही भाकड जनावरांना मोकाट सोडून देतात, तशाच प्रकारे अनेक जुन्या जहाजांना समुद्रामध्ये सोडले जाते. काही वेळा नाविकांना जहाजावरतीच सोडले जाते.

असे अनेक प्रसंग ‘सेलर्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया’ने पुढे आणले आहेत. ४०० पेक्षा जास्त भारतीय नाविकांना धोकादायक परिस्थितीमध्ये सोडून दिले. आज जगातील १३ ते १५ टक्के व्यापारी जहाजांवरती काम करणारे नाविक हे भारतीय आहेत. अनेक भारतीय नागरिक हे वेगवेगळ्या परदेशी कंपन्या, ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये रजिस्टर झालेल्या आहेत, त्यावर काम करतात. मात्र, ज्या वेळेला धोकेदायक परिस्थिती निर्माण होते, जसे की, समुद्रामध्ये झालेले अपघात किंवा बंदरामध्ये झालेले अपघात, अशा वेळेला त्या कंपन्या आपल्या नाविकांना वाचविण्याऐवजी त्या जहाजांना मोकाट सोडून देतात. अनेक नाविकांना पगार मिळत नाही. अनेक वेळा जेवण आणि पाण्याचीसुद्धा कमतरता भासते. एका प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे ४०० पेक्षा जास्त भारतीय नाविकांना त्यांच्या कंपन्यांनी, वार्‍यावर धोकादायक परिस्थितीमध्ये सोडून दिलेले आहे. त्यांना सोडवणे महत्त्वाचे आहे.

अडकलेले अनेक नाविक गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून समुद्र क्षेत्रात नोकर्‍या शोधतात. लबाड मॅनिंग एजंट्स किंवा शिपिंग कंपन्या त्यांना धोकादायक जहाजांवर पाठवतात, त्यांचे वेतन रोखतात. अनेक वेळा अर्धशिक्षित नाविकांना जहाजावर पाठवले जाते, ते अर्धशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त काम करविले जाते, पगार कमी दिला जातो, अनेक वेळा त्यांना बंधक बनविले जाते. म्हणून, भारताच्या बाहेर जाणार्‍या प्रत्येक नाविकांची पात्रता म्हणजे शिक्षण हे ‘डीजी शिपिंग’कडून तपासले जावे. कुठल्या एजंटच्या माध्यमातून त्यांना काम केले जात आहे, त्याचेसुद्धा तपशील आपल्याकडे असावे.

अजून काय करावे?

युवकांना पुन्हा पुन्हा सांगितले जावे की, बेकायदेशीर किंवा अनधिकृत एजंटकडून कुठल्याही नोकरीमध्ये विशेषतः परदेशात जाऊ नये, ते धोकादायक आहे. ज्या ज्या एजंट्सना बेकायदेशीर कृतींमध्ये पकडले आहे, त्यांना शिक्षा केली जावी. यामुळे बेकायदेशीर एजन्सीची संख्या कमी होईल. आंतरराष्ट्रीय समूहाने सगळ्या जहाज कंपन्या किंवा व्यापारी जहाजांना त्यांची पूर्ण माहिती नोंद करणे, हे अनिवार्य केले जावे. यामुळे गरज पडली, तर अशा कंपन्यांकडून किंवा जहाजांच्या मालकाकडून मोबदला वसूल केला जाऊ शकतो. ‘इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशन’च्या मदतीने वेगवेगळ्या बंदरांमध्ये आणि देशांमध्ये अडकलेल्या जहाजांचा वेळोवेळी तपास केला जावा आणि त्यावर अडकलेल्या नाविकांना सोडण्याकरिता प्रयत्न केले जावे.

एजंट्स किंवा कंपन्यांनी कठीण प्रसंगांमध्ये नाविकांना जर सोडून दिले, तर त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमचे या व्यापारी जहाजाच्या व्यवसायामधून बाहेर काढले जावे. याकरिता सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन अशा बेकायदेशीर काम करणार्‍या शिपिंग कंपनीज, त्यांच्या एजंटवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अनेक भारतीय नाविक हे सोमालियन चाच्यांच्या तुरूंगांमध्येसुद्धा अडकलेले असतात. त्यावर लक्ष असावे म्हणूनच दर एक ते दोन महिन्यांनंतर अशा प्रकारचे कुठलेही भारतीय नाविक कोठेही अडकले असतील, तर त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जावा. असे केले नाही, तर आपल्याला दिसेल की, अनेक भारतीय, त्यांची काहीही चूक नसताना वेगवेगळ्या देशांच्या तुरूंगांमध्ये किंवा वेगवेगळ्या जहाजांवर अडकलेले असतील. त्यांच्या मानवाधिकारांचे रक्षण करणे, हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन