सलमान खान प्रकरणात अनमोल बिश्नोई विरोधात लूकआउट नोटीस जारी

27 Apr 2024 17:11:34

salman khan  
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणी अनमोल बिष्णोईविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले आहे. अनमोल बिष्णोईने सलमानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करण्याचा कट रचला होता, आणि त्याने त्याची जबाबदारी स्वीकारली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत ४ जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई देखील सुरु आहे.
 
लॉरेन्स बिष्णोई या टोळीला सध्या अनमोल बिष्णोई चालवत आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन एक पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात देखील आली होती. याशिवाय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात सहभागी अनमोलने हा गोळीबार सलमान खानसाठी पहिला आणि शेवटचा इशारा असल्याचे देखील पोस्टमध्ये लिहिले होते. या पुढे भिंतींवर किंवा रिकाम्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत धमकी देखील दिली आहे. सलमान खान, आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केले आहे. त्यामुळे तुला आमच्या क्षमतेची जाणीव झाली असेल. तुझ्यासाठी हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. तसेच, ही फेसबुक पोस्ट खरोखच पोर्तुगालवरून करण्यात आली आहे की नाही याचा तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलीस तपास करत आहेत.
 
दरम्यान, अनमोल व त्याचा भाऊ लॉरेन्स बिष्णोई यांना सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी अनमोल विरोधात लुक आऊट नोटीस जारी करत त्याच्या विरोधात पंजाब व चंदीगडमध्ये सुमारे १२ ते १३ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहेत.
Powered By Sangraha 9.0