"राऊतांनी कोल्हापूरचा नियम साताऱ्यातही लावावा!"

भाजप आमदार नितेश राणेंचा टोला

    27-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
मुंबई : संजय राऊतांनी कोल्हापूरमध्ये लावलेला नियम साताऱ्यातही लावावा. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात शशिकांत शिंदेंना का उमेदवारी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
"देशाच्या पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान करु नये. छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात प्रचार करणे हा त्यांच्या गादीचा अपमान आहे," असे संजय राऊत म्हणाले होते. यावर नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊतांनी हीच भूमिका साताऱ्यामध्ये का घेतली नाही. तिथे छत्रपती उदयनराजे भोसले उमेदवार आहेत आणि ती गादीदेखील आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. अशावेळी शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार का उभा आहे?"
 
"जो नियम तुम्हाला कोल्हापूरला लावायचा आहे तोच साताऱ्यामध्येसुद्धा लावावा. त्याठिकाणी थेट उदयनराजे भोसलेंच्या विरोधात तुमचे शशिकांत शिंदे तुतारी वाजवायला बसले आहेत. त्यामुळे उगाच स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून ही घाणेरडी सवय संजय राऊतांनी आता बंद करावी. आधी तुम्ही साताऱ्याची उमेदवारी मागे घ्या, त्यानंतर आम्ही विचार करु," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की,"देशाच्या पंतप्रधानांनी देशासाठी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे बघण्यासाठी राऊतांनी गर्दीत खुर्ची टाकून बसावं आणि मोदीजींची मॅजिक बघावी. संजय राऊतांनी याआधी छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागितले होते. त्यामुळे तुमच्या तोंडातून आता छत्रपतींच्या घराण्याच्या बाजूने काही ऐकणं हाच मुळात मोठा अपमान आहे. राऊतांनी आधी माफी मागावी आणि मगच छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.