काँग्रेसचा प्रचार करणार नाही! बड्या नेत्याची घोषणा

    27-Apr-2024
Total Views |
 
Congress
 
मुंबई : यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशी घोषणा काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली आहे. पक्षाने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. तसेच त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामादेखील दिला आहे.
 
नसीम खान म्हणाले की, "प्रत्येक क्षेत्रात सर्व समाजाला समान प्रतिनिधित्व मिळायला हवं, ही काँग्रेसची नेहमीची भूमिका आहे. परंतू, सध्याच्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रमुख संघटनांनी मला फोन करुन याबद्दल रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसची अशी कोणती मजबूरी आहे की, पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्यांक उमेदवार दिला नाही, असा प्रश्न लोक मला विचारत आहेत. मी सुद्धा त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहे."
 
"मराठवाड्यात अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याठिकाणी ३० ते ३५ टक्के अल्पसंख्याक समाज आहे. याशिवाय विदर्भ आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांची संख्या आहे. अशावेळी मविआने किंवा काँग्रेसने एकाही मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार का दिला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. निवडणूकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मी अनेक ठिकाणी जाऊन पक्षाचा प्रचार केलेला आहे. परंतू, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये मी स्टार प्रचारक आणि महाराष्ट्र प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे," असेही ते म्हणाले.