भारत-जपान यांच्यात बुलेट ट्रेन संदर्भात महत्वपूर्ण बैठक

१७ व्या संयुक्त समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा

    27-Apr-2024
Total Views |

bullet


नवी दिल्ली, दि.२७ : वृत्तसेवा 
भारत आणि जपानने २५ एप्रिल रोजी झालेल्या १७व्या संयुक्त समितीच्या बैठकीत मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे(एमएएचएसआर) प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जपानी पंतप्रधानांचे विशेष सल्लागार मासाफुमी मोरी यांच्यासोबत ऑनलाइन बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषविले.

भारतीय रेल्वे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)चे उच्च अधिकारी भारताच्या बाजूने या बैठकीला उपस्थित होते. तर जपानच्या बाजूने जपान, परराष्ट्र व्यवहार, वित्त, अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग, जमीन, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) या मंत्रालयांसह संबंधित मंत्रालये आणि एजन्सीचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "या बैठकीत आम्ही मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीची पुष्टी केली आणि प्रकल्पाची स्थिर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वेवर शिंकानसेन प्रणाली लागू करण्यासाठी जपान सरकार भारत सरकारसोबत जवळून काम करत राहील.” अलीकडेच मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या शुभारंभाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात भरीव प्रगतीची माहिती दिली. "२९० किमी पेक्षा जास्त काम आधीच केले गेले आहे. आठ नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. 2026 मध्ये पहिला टप्पा उघडण्याचे लक्ष्य ठेवून काम अतिशय वेगाने सुरू आहे. अहमदाबाद-मुंबई मार्गावर पहिली बुलेट ट्रेन वर्ष २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.", अशी माहिती त्यांनी दिली होती.