नको

    26-Apr-2024
Total Views |
loksabha election voting


सध्या निवडणूक रणधुमाळी ऐन बहरात असताना, मतदानाच्या उदासीनतेने राजकीय पक्षांच्या झोपा उडविल्या आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी प्रचार सभांमधून मतदानाचे आवाहन करूनदेखील, मतदार मतदानाकडे पाठ फिरवतात असे चित्र आहे. मतदानाला जाणे मतदाराला का नको, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये, आपल्या राज्यातील मतदान टक्केवारीच्या आकडेवारीतील हे चढ-उतार खरे तर राजकीय पक्षांच्या अरेरावी किंवा जनतेप्रती असलेल्या त्यांच्या दुराव्याबाबत इशारा देणारेच होते. मात्र, तरीही हे पक्ष गाफील राहिले, असेच या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान कमी होण्याच्या आकडेवारीवरून वाटते. नाही म्हणायला, काही पक्षांनी मतदान वाढीसाठी आणि आपला मतदार जवळ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, हेदेखील तितकेच खरे आहे. मात्र, हे तर परीक्षेत हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांपेक्षा, कॉपी बहाद्दरांनी बाजी मारण्यासारखे झाले आहे. आता चिंतेचा विषय मतदारांची उदासीनता नेमकी कशात आहे, याचा शोध लावायचा तरी कसा? हा आहे. कारण, जरी वरवर मतदान करायला मतदार हे राजकीय पक्षांच्या अकार्यक्षमतेमुळे बाहेर पडत नसावे, असे जरी गृहीत धरले तरी, यातदेखील फार तथ्य आहे, असे वाटत नाही. यामागील कारणे खूप क्लिष्ट आहेत, असे आता वाटायला लागले. काही मतदारांची नावे मतदार यादीत नसणे, काही मतदार मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाल्याने, मतदान केंद्रावर वेळेत जाऊ न शकणे, काहींच्या अन्य तांत्रिक त्रुटी असणे, काही मुद्दाम त्याच दिवशी सहलीवर जाणे अशी अनेक कारणे असू शकतात. आणि याचा निवडणूक होण्यापूर्वी व्यवस्थेत विचार केला न जाणे, हे अतिशय गंभीर आहे, असे म्हणायला खूप वाव आहे. प्रशासकीय, सामाजिक, संघटनात्मक पातळीवर जरी विविध उपाय केले गेले असले, तरी ते प्रभावी नाहीत हेच उत्तर या पहिल्या दोन टप्प्यांतील कमी टक्केवारीने दिले आहे. लोकशाहीचा उत्सव म्हणून गाजावाजा करायचा आणि मतदारांनीच या उत्सवात सहभागी व्हायचे नाही, असे काहीसे विचित्र प्रयोजन झाल्याची भावना अशावेळी निर्माण झाली, तर त्यात गैर काही नाही. तथापि, मतदारांनी आळस झटकून शक्य असल्यास मतदान करण्यासाठी नक्की जावे, एवढेच तूर्त म्हणावे लागेल.

नकोसे
 
मतदारांची उदासीनता जशी मतदान प्रक्रियेतून दिसत आहे, तशीच काहीअंशी जे राजकारणाचे अप्रिय दर्शन रोज काही चेहरे बघून होत असते यामुळेदेखील आहे. राजकारणात दिसणारा हा असंस्कृत प्रकार महाराष्ट्रासारख्या संस्कृती प्रिय राज्यात नेहमीचा झाल्याने किंवा जाणीवपूर्वक काहींनी सुरू ठेवल्याने, आता नकोसा झाला असल्याची भावना मतदारात बळावत चालली आहे. विकासाची कामे करणार्‍यांना टोमणे मारणे, हिणवणे, मुद्दे सोडून काही बाही बोलणे, शिवराळ भाषेचा जाणूनबुजून उपयोग करणे, ठराविक माध्यमांकडून आणि सोशल मीडियावरून त्याचे उदात्तिकरण करणे, यामुळे भावी पिढीला तर राजकारण म्हणजे टोमणे एवढेच मारणे असते, असा धडा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज माध्यमांवर येऊन प्रसिद्धीसाठी पातळी सोडून बोलण्याची शर्यत, राजकारण्यांमध्ये लागली होती. विशेष म्हणजे हे रोज दिसणारे आणि वाटेल ते बोलून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारे चेहरे, आणि विकास कामे करून, त्या विकासाला गती देण्याचे आश्वासन देणारे, त्याचे नियोजन करणार्‍या चेहर्‍यातील फरक आता हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. असे असले तरी, या नकोशा चेहर्‍यांचा या आपल्या सुसंस्कृत राज्यात कायमचा निकाल लावावा लागेल या निष्कर्षापर्यंत सूज्ञ लोक आले आहेत. काही चेहरे तर आता राजकारणात नसावेच, अशीदेखील मानसिकता होऊ लागल्याची भावना प्रबळ होत आहे. काही जवळच्या लोकांनीच ते बोलून दाखविल्याने यावर खरेतर शिक्कामोर्तबदेखील झाले आहे. त्यामुळे भविष्यात या नकोशा चेहर्‍यांचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मतदारांचा विश्वासघात करून सत्ता बळकावणे आणि वर यांचे निर्ल्लज्जपणे समर्थन करणार्‍यांचा लोकांना आलेला राग समर्थनीय असताना, राज्यात मात्र तेच योग्य असल्याचे चित्र रंगविण्यात आले होते. याप्रकाराला आता उतरती कळा लागली आहे, कारण तुकडे तुकडे गँग बनलेले हे लोक जी काही भाषा वापरत आहेत, ती लोकांच्या पचनी पडत नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आणि विशेष म्हणजे ही जाणीव त्यांना झाल्याने त्यांचा द्वेष रोज उफाळून येत आहे, मग हे लोक नकोसे झाले असतील, तर त्यात नागरिकांचे चुकले कोठे?

अतुल तांदळीकर