मुंबई : सांगलीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी विशाल पाटील अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने सांगलीची जागा लढवावी, याकरिता आ. विश्वजीत कदम यांच्यासह विशाल पाटील यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासर्व प्रकारावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विशाल पाटलांवर कारवाई व्हायला हवी होती.
विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी माघार घ्यावी म्हणून पक्षाकडून मनधरणी करण्यात आली होती. परंतु, त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यावर आता संजय राऊत म्हणाले की, जर कुणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढणार असेल. भाजपला मदत व्हावी म्हणून ती व्यक्ती काम करत असेल. तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झाली पाहिजे. शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे, असेदेखील संजय राऊत म्हणाले.
हे वाचलंत का? - नाशिकची जागा शिवसेनेचीच!, उद्यापर्यंत उमेदवार जाहीर होणार!
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला सांगलीत विशाल पाटलांकडून आव्हान देण्यात येत आहे. विशाल पाटलांच्या सांगली मतदारसंघातील भूमिकेमुळे निवडणूक घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सांगलीची जागा ठाकरे गट लढविणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे सांगलीतून काँग्रेसने माघार घेतल्यानंतर विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. तसेच, भाजपकडून संजय काका पाटील अशी तिरंगी लढत सांगलीत होणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात सांगलीत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर दि. ०४ जूनला कोण बाजी मारणार, हे ठरणार आहे.