मुंबई महापालिकेचे 'हिवताप मुक्त मुंबई' मिशन

मलेरिया निर्मूलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन

    26-Apr-2024
Total Views |

bmc
मुंबई, दि.२६ :  मुंबईला हिवताप मुक्त करण्यासाठी विविध यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांसह नागरिकांचा सहभाग वाढवण्याचे मिशन बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून हिवताप नियंत्रणासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेमार्फत नायर दंत रूग्णालय आणि महाविद्यालय येथे हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, उपचार, मार्गदर्शन तसेच मलेरिया निर्मूलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी डॉक्टर्स, फॅमिली फिजिशियन, मुंबई (इंडियन मेडिकल असोसिएशन) पदाधिकारी व सदस्य तसेच महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर्स इत्यादींकरिता नायर दंतविद्यालय येथील सभागृहात बुधवार, दि.२४ एप्रिल रोजी एक दिवशीय परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हिवतापाविरुद्धच्या लढ्यात हिवताप रूग्ण उपचार व मार्गदर्शन, प्रयोगशाळा निदानाचे महत्त्व, मूलगामी उपचारांची गरज, समुदाय जागरूकता आणि मुंबईतील डासांच्या उत्पत्ती नियंत्रणाच्या उपाययोजनांविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
यावर्षीच्या जागतिक हिवतापदिनाचे घोषवाक्य "हिवताप निर्मूलन: हिवताप विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा हिवतापाला हरविण्यासाठी' वर्ष २०२४ साठीचे घोषवाक्य" असे आहे. त्यामुळे मुंबईला हिवताप मुक्त करण्याच्या वचनबद्धतेबद्दल समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न केल्यास आपण त्यात यशस्वी होऊ, असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये तथा अधिष्ठाता (नायर दंत महाविद्यालय) डॉ. नीलम अन्द्राडे यांनी मांडले.