म्हाडाच्या १७ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया निवडणुकीनंतरच

मुंबई मंडळाला या भूखंडांच्या विक्रीतून सुमारे १२५ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज

    26-Apr-2024
Total Views |

mhada


मुंबई दि.२६ : 
म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठीच्या १७ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. या ई-लिलावासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा प्रसिद्ध केली आहे. ही निविदा सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात येणार होती. मात्र, या भूखंडांसाठी निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबई मंडळाला या भूखंडांच्या विक्रीतून सुमारे १२५ कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

मुंबई मंडळाने मुंबईतील १७ भूखंड मार्चमध्ये विक्रीसाठी काढले आहेत. मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा त्यात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाचे हे भूखंड असून या भूखंडासाठी मुंबई मंडळाने बोली निश्चित केली आहे. या भूखंडांसाठी प्रति चौरस मीटर ४५ हजार ३०० रुपयांपासून १ लाख ६ हजार १७० रुपयांपर्यंत दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीहून अधिक बोली लावणाऱ्या संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या १७ भूखंडांच्या ई-लिलावासाठी १३ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या ई-लिलावास प्रतिसाद वाढावा यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. मुख्य अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये भूखंडांचा ई-लिलाव होण्याची शक्यता आहे.