निवडणुकीत उमेदवारांकडे ‘एआय’चे दुधारी अस्त्र!

राजकीय पक्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा हाताळण्यासाठी चढाओढ

    26-Apr-2024
Total Views |
AI Technology Election candidates



मुंबई (तेजस परब) :
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी डिजिटल प्रचाराचा धुरळा तर उडवलाच आहे. पण, याशिवाय आता काही उमेदवार चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करू लागले आहेत. निवडणुकांमध्ये प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी, भाषांतरासाठी ‘एआय’चा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल अँकरही उमेदवारांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील आपल्या भाषणात ’भाषिणी’ या ‘एआय’ टूलचा वापर तामिळ भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “मी पहिल्यांदाच ‘एआय’चा वापर करत आहे आणि भविष्यातही करणार आहे. येत्या महिन्याभरात जसजसा निवडणुकांचा प्रचार अधिक रंगत जाईल, त्यावेळी सोशल मीडियाद्वारे भाषणांचे व्हिडिओ त्या-त्या राज्यांसाठी प्रादेशिक भाषेत प्रसारित केले जातील,” भाजपतर्फे एक युट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे, ज्यात मोदींची भाषणे बंगाली, तामिळ आणि मल्याळम भाषेत अपलोड केली जातात. भाजपचे विरोधकही यात कुठेही पिछाडीवर नाहीत.

द्रमुकतर्फे एक वेगळी शक्कल लढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते एम. करुणानिधी मतदारांना आवाहन करत आहेत. करुणानिधींचे 2018मध्येच वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, ‘एआय’च्या मदतीने त्यांची प्रतिमा साकारून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम बंगालच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवाद) ‘एआय’ अँकर असलेल्या ’समता’ प्रचार करत आहेत. भाकपतर्फे सोशल मीडियावर आपला प्रभाव वाढविण्यासाठी व्हिडिओ तयार केले जात आहेत.


‘डीपफेक’पासून सावध आणि सतर्कता

निवडणुकीत पक्षांचा प्रचार करण्यासाठी ‘एआय’चा वापर हा सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. यातच अद्याप नियमावलीही स्पष्ट झालेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतरच याबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ‘डीपफेक’ व्हिडिओज् आणि भ्रामक प्रचारापासून सावध राहण्याची काळजी मतदारांनी घेणे हे मोठे आव्हान असणार आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खानच्या अशाच एका ‘डीपफेक’ व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला होता.
 
लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘एआय’चा वापर हे फारच आश्वासक आणि परिणामकारक आहे. मात्र, यातील गैरवापरावर तितकाच अंकूश गरजेचा आहे. ‘एआय’वर नियमावली गरज स्पष्ट दिसते आहे, अन्यथा ‘डीपफेक’ सारख्या गोष्टी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम करू शकतात. पुन्हा अधोरेखित करावेसे वाटते, ते म्हणजे ‘एआय’ तंत्रज्ञानावर नियंत्रण न आणल्यास ते एखाद्या बेलगाम घोड्यासारखे स्वैर उधळेल.
- प्रा. अमरेश कुमार, सहा. प्राध्यापक-मार्केटिंग, आयआयएम बोधगया