बीएमसीचे ३०० अभियंते गिरवणार रस्ता दर्जोन्नतीचे धडे

26 Apr 2024 20:13:16

bmc


मुंबई, दि.२६ :  
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ही रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे अत्‍युच्‍च व सर्वोत्‍तम दर्जाची व्‍हावीत यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रस्‍ते बांधणीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, रस्‍ते बांधणी करताना काय करावे, काय करू नये तसेच प्रत्‍यक्ष ‘फिल्‍ड’वर काम करणाऱ्या अनुभवी अभियंत्‍यांच्‍या शंकांचे निरसन व्‍हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
पवईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्‍था (आयआयटी, मुंबई) येथे शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेस प्रारंभ होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेचे (आयआयटी) स्‍थापत्‍य अभियांत्रिकी विषयातील नामांकीत तज्‍ज्ञ प्रा. डॉ. के. व्‍ही. कृष्‍ण राव हे महानगरपालिका अभियंत्‍यांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत महानगरपालिकेच्‍या १५० अभियंत्‍यांना सिमेंट कॉक्रिट रस्‍ते बांधणीचे तंत्रशुद्ध व शास्‍त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कॉंक्रिट रस्‍ते बांधणी कामे अधिक दर्जेदार आणि गुणवत्‍तापूर्ण व्‍हावीत, अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, तांत्रिक ज्ञानाबरोबरच रस्‍ते बांधणीसाठी काय करावे आणि काय करू नये दैनंदिन कार्यप्रणालीत सुधारणा या विविध पैलुंची माहिती अभियंत्‍यांना व्‍हावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मार्गदर्शन, प्रशिक्षणाबरोबरच प्रत्‍यक्ष क्षेत्रावर कार्यरत असणा-या अभियंत्‍यांच्‍या विविध शंका – प्रश्‍न आदींचे देखील निरसन ‘आयआयटी-मुंबई’तील तज्‍ज्ञ प्राध्‍यापक मंडळी या कार्यशाळेत करणार आहेत. शनिवार, दिनांक २७ एप्रिलच्‍या कार्यशाळेत १५० स्‍थापत्‍य अभियंत्‍यांना तर शनिवार, दिनांक ४ मे रोजीच्‍या कार्यशाळेत आणखी १५० स्‍थापत्‍य अभियंत्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0