“DNAमध्ये फक्त तीनच नावं…”, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर चिन्मयने व्यक्त केल्या भावना

25 Apr 2024 13:31:53
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात चिन्मय मांडलेकरच्या ‘गालिब’ नाटकाला गौरविण्यात आले.
 

chinmay mandalekar 
 
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mandalekar) म्हणाला की, “प्रत्येक कलाकाराच्या डीएनएमध्ये तीनच नावं असतील मंगेशकर, बच्चन आणि सराफ”.
 
चिन्मय मांडलेकर आभार मानत म्हणाला, “नाटकाला पुरस्कार मिळणं ही खूप गोष्ट आहे. यामध्ये संपूर्ण टीमची मेहनत आहे. फक्त एकच गोष्ट बोलेन, भारतात जन्माला आलेल्या लहान मुलाच्या डीएनएमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात. एक असतं मंगेशकर, दुसरं असतं बच्चन आणि तिसरं नाव कारण मी महाराष्ट्रातून आहे ते म्हणजे सराफ.”
 
पुढे तो असं देखील म्हणाला की, “जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा पाहिलेला पहिला चित्रपट ‘नमक हलाल’ होता. ‘अशी ही बनवाबनवी’ कमीत कमी १०० वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. इथूनच प्रेरणा घेऊन आज इथंपर्यंतचा प्रवास झाला आहे. जेव्हा कोणी विचारतं तू या क्षेत्रात का आला आहेस? तेव्हा या उत्तरात डीएनएमध्ये असलेली ही तीन नावं कारणीभूत आहेत. मंगेशकर, बच्चन आणि सराफ”.
 
यावेळी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देखील मान्यवरांना प्रदान करण्यात आले. अशोक सराफ, अतुल परचुरे, ए.आर.रेहमान, रुपकुमार राठोड, पद्मिनी कोल्हापुरे यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0