चांदणे शिंपीत जाशी..

    25-Apr-2024
Total Views |

chandane shimpit 
 
मागे मर्ढेकरांच्या कवितेचे रसग्रहण करताना आशाजींच्या चांदणे शिंपीत जाशीचे रसग्रहण तुमच्याकडून ऐकायला आवडेल अशी एक प्रतिक्रिया होती. आनंदस्वरूप हंसध्वनी रागातले हे गीत चंद्र पृथ्वीसाठी गातोय अशी कल्पना आहे. थोड्या तांत्रिक माहितीसहित हे शृंगारपूर्ण शब्दगित उलगडून सांगते.
 
बरं एक प्रश्न, मोकळ्या माळावर पौर्णिमेच्या रात्री किंवा समुद्रकिनाऱ्यावर रात्री चांदणे पडते तेव्हा लाटा चमचमतात, तेव्हा आपण म्हणतो किती सुरेख चांदणे पडले आहे. आता चंद्राच्या तुलनेत पृथ्वी किती मोठी आहे. तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवरून सूर्याचा परावर्तित होणार प्रकाश केवढा असेल केवळ कल्पनाच करा. म्हणून राजा बढे म्हणतात,
 
चांदणे शिंपीत जाशी चालतां तूं चंचले 
ओंजळीं उधळीत मोतीं हासरी ताराफुलें हृदयनाथ
 
चंचल म्हणालेत पृथ्वीला. सूर्यही फिरतोय. फिरतोय का? कशाप्रकारे? कुणाच्या कक्षेत, किती वेगाने आपल्याला अजून महती नाही. आपण त्याला स्वयंभू म्हणतो ना, पण त्या सूर्याभोवती पृथ्वीमात्र कोणत्या वेगात फिरतेय आपल्याला माहिती आहे. तिच्या त्या वेगाला उद्देशून तिला चंद्र चंचला म्हणतोय. तिच्या भरती ओहोटीच्या वेळा आणि त्या आंदोलनांनी फेसाळणारे समुद्रकिनारे अगदी उसळून उसळून येत असतात. किनाऱ्यांवर फेसाळ थेम्ब फेकत असतात. मोत्यासारखे दिसणारे हे जलघन म्हणजे मोती अशी कल्पना तो करतो. या ओळीचा अर्थ असाही लावला जातो, पृथ्वीची प्रभा इतकी शीतल आहे तसेच चंद्रावरील वातावरण दूषित नसल्याने तारे अधिक दिसतात. तेव्हा ही ताराफुले म्हणजेच तिने उधळले मोती आहेत. राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिले आहे. आणि हे गीत आशा भोसले यांनी गायले आहे. आता पुढच्या ज्या २ ओळी आहेत त्या ऐकायला कितीही सोप्या वाटल्या तरी सहज गाता येत नाहीत. गाऊन पहा. आशाजींच्या गणाची हीच खासियत आहे. आपल्याला कल्पना आहे मध्यंतरी लता दीदी आणि आशाजी यांच्या काही वितुष्ट होती. परंतु सर्वांनीच त्यांच्यावर प्रेम केले. संगीताचा अमूल्य वारसा असा पिढीजात लाभल्यावर होणार तरी काय? आशाजींच्या व्यक्तिमत्वात जी ग्रेस आहे, ती त्यांच्या गीतातून अशी फेसाळत बाहेर पडते. त्यांचा हाच अटीट्युड रसिकांना विभोर करतो. त्या ओळी आहेत,
 
वाहती आकाशगंगा कीं कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिलें
 
कटीची मेखला म्हणजे कमरेची शृंखला. केव्हा रात्र जागवत आपल्या जवळच्या माणसांसोबत तारे पाहीलेयत? अमावस्येच्या रात्री आकाशगंगा उगवते तेव्हा ती एखाद्या पट्ट्यासारखी मावळतीस जाते. ही आकाशात वाहते आहे आणि ती पृथ्वीच्या कमरेला बांधलेली साखळी असं हे वर्णन. तर ते विलक्षण अतिप्रचंड तेज म्हणजे पदराला जरतारी चंदेरी तारा लावल्या आहेत अशी कल्पना. १९५२ साली १९ मार्च रोजी हे काव्य राजा बढेंने लिहिले होते. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरींचा राग हंसध्वनी. या रागातच किती उल्हास आहे, वेग आहे, मूळ कर्नाटकी संगीतातील हा राग पण हिंदुस्थानी संगीतालाही आपलंस वाटला. तेवढ्याच सहजतेने तो रुळला. काहीसा बिलावल तर काहीसा कल्याण थाटाकडे झुकणारा हा राग. यात मध्यम आणि धैवत स्वर वर्जित आहेत. सर्व शुद्ध स्वरांसोबत पंचम रिषभ, रिषभ निषाद तसेच षडज पंचम यात दिसून येतो.
 
आता इथे पहा, चंद्र पृथ्वीच्या झुरणी लागला आहे जसा, तो म्हणतो की माझं सगळं समर्पण तुझ्या पायाशी आहे. तुझ्या नादात तुझ्या भोवतीने मी फिरत राहतो केवळ. शब्द आहेत,
 
गुंतवीले जीव हे मंजीर कीं पायीं तुझ्या
जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले
 
मंजिरी म्हणजे पैंजण. पायातले छुमछुम. हे गीत हृदयनाथ मंगेशकरांचे पहिले भावगीत. आता काळ पहा म्हणजे किती मागचा असेल. हे गीत जेव्हा रेकॉर्ड झाले तेव्हा कोणताही उपग्रह पृथ्वीवरून सोडला गेला नव्हता. ५८ साली रशियाने स्पुतनिक सोडला. तोवर ही सर्व कल्पनाचित्रेच राजा यांनी काढली आहेत. कविकल्पना किती अत्युच्य असतात ते पहा. हृदयनाथजी कोणतेही गीत अर्थ समजल्याशिवाय गात नाहीत तेव्हा या गीताचा त्यांना अर्थ काय सांगितला गेला असेल हे जाणून घेणे हीसुद्धा पर्वणी आहे. शेवटच्या ओळीत ते म्हणतात,
 
गे निळावंती कशाला झांकिसी काया तुझी !
 
पृथ्वी निळी दिसते. कोणतेही निखळ सौंदर्य अनावृत्त पाहायला आपल्याला आवडतेच ना. विमानात बसल्यावर बाहेर पाहताना मात्र क्षितिजापर्यंत पसरलेले शुभ्र ढगच दिसतात तर कधी हे पुंजक्या पुंजक्यातून वाहत असतात. तिचं अवीट, लोभसवाणं नीलगर्भीत सौंदर्य मोकळं केव्हा दिसेल या प्रतीक्षेत हिच्याशी तो फिरत राहतो. आणि म्हणतो,
 
पाहुं दे मेघांविण सौंदर्य तुझें मोकळे
चांदणे शिंपीत जाशी चालतां तूं चंचले