राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान

25 Apr 2024 19:33:00
 voting
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार २०४ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. या मतदानासाठी १६ हजार ५८९ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून एकूण ९६ मतदान केंद्रे ही संवेदनशील आहेत. या केंद्रांवर सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे, प्रहार जनशक्तीचे उमेदवार दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यात चौरंगी लढत आहे. वर्धा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचा सामना शरद पवार गटाच्या अमर काळे यांच्याशी होणार आहे. अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत आहे.
 
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा सामना उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी होणार आहे. हिंगोलीत महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात, परभणीच्या जागेवर रासपचे प्रमुख महादेव जानकर, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आणि नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार डॉ. प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण. बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि उबाठा गटाच्या नरेंद्र खेडकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0