राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या काळात दिलासा

घाटघर उदंचन जल विद्युत वीजनिर्मिती संच सुरु

    25-Apr-2024
Total Views |

ghatghar


मुंबई, दि.२५ :
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. अशावेळी वाढत्या मागणीनुसार वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विजेच्या ग्रीडला संतुलित करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर जल विद्युत केंद्राची महत्वाची भूमिका असते. अधिक वीज मागणीच्या काळामध्ये वीज पुरवठा करण्यामध्ये हा उदंचन जल विद्युत प्रकल्प अत्यंत महत्वाचे योगदान देतो. या प्रकल्पातील संच क्र. १ कार्यान्वित झाल्यामुळे उन्हाळ्यात वाढलेल्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. घाटघर उदंचन जल विद्युत केंद्राची स्थापित क्षमता २५० मेगावॅट असून प्रत्येकी १२५ मेगावॅटच्या दोन संचांद्वारे सरासरी ४६८.१५ दशलक्ष युनिट्स वार्षिक वीज उत्पादन होत असते.
या संचामध्ये स्टेटर अर्थ फॉल्ट आल्याने दि. २० एप्रिल २०२२ ते १७ डिसेंबर २०२३ पर्यंत हा संच बंद होता. मात्र, राज्यातील विजेची वाढती मागणीचा अंदाज घेता महानिर्मितीच्या अभियंता आणि तांत्रिक कर्मचार्‍यांनी सुमारे साडेतीन महिने अथक परिश्रम घेत आणि गुंतागुंतीच्या प्रणालीमध्ये संशोधन करून हा संच दुरुस्त करण्यात यश मिळवले. फूजी जपान तंत्रज्ञानाच्या बनावटीचा हा संच २० एप्रिल २०२४ रोजी पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. घाटघर जल विद्युत केंद्र हे कमी वीज मागणीच्या काळात रात्री बारा ते सकाळी ८ उदंचन करणेसाठी तर अधिक वीज मागणीच्या काळात सकाळी ९ ते दुपारी १२ व संध्याकाळी ६ ते रात्री १० संचालित करण्यात येते. घाटघर उर्ध्व धरणाची कमाल पातळी ७५६ मि. राखली जाते.
या यशस्वी कामगिरीबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच संचालक (संचलन) व कार्यकारी संचालक यांनी मुख्य अभियंता (जल) अभिजीत कुलकर्णी, अधीक्षक अभियंता गौतम कंबोज, कार्यकारी अभियंता ए. एस. मोरे, टी. एस. चौधरी व उप कार्यकारी अभियंता पी. बी. काशीव, निलेश भोळे आणि उन्मेष पाटील तसेच घाटघर चमू यांचे विशेष अभिनंदन केले आहे.