“एका असामान्य कुटुंबाकडून आणि एका...”, अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया

    25-Apr-2024
Total Views |
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावूक झाले होते.
 

ashok saraf 
 
मुंबई : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, यावेळी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानत हा तुम्हा सर्वांचा सन्मान आहे असे म्हटले.
 
अशोक सराफ म्हणाले की, “आता माझ्याबरोबर या मंचावर सगळे थोर कलावंत बसलेले आहेत. यांच्यासमोर माझा सन्मान होणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले. आता मला आठवतही नाही आणि मोजताही येत नाही. पण, आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी फारच महत्त्वाचा आहे. मी एक कलाकार आहे आणि एका असमान्य गायक कलाकाराच्या म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे. एका असामान्य परिवाराकडून हा पुरस्कार मला मिळत आहे आणि आज इथे एक मोठा असामान्य नट देखील उपस्थित आहे. ही सगळ्यात मोठी आणि माझ्या कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे.”
 
पुढे ते म्हणाले की, “हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नसून तुम्हा सर्वांचा आहे. कलाकार त्याच्या परीने वेगवेगळे प्रयोग करत असतो. पण, ते प्रयोग तुम्हाला पटले नाहीत तर, त्याचा काहीच उपयोग नसतो. पण, केलेलं काम तुम्हाला आवडलं, तुम्ही दरवेळी त्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त करता आणि त्या तुम्ही केल्या. माझी एवढ्या वर्षांची तोडकी मोडकी सेवा त्यांनी समजून घेतली त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा क्षण माझ्या हृदयात राहील आणि मी कधीही विसरू शकणार नाही.” अशा भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
 
दरम्यान, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा दीनानाथ नाट्यगृह येथे संपन्न झाला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात येतो.