म्हाडाही आता समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह

24 Apr 2024 14:40:07

mhada




मुंबई दि.२४ :
आज तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच समाज माध्यमांचं आकर्षण आहे. हेच ओळखून आजच्या डिजिटल युगात सर्व प्रशासकीय विभाग, मंत्री, राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये आपला आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच माध्यमातून अनेक प्राधिकरण आणि सरकारी कार्यालये नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट हाताळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र क्षेत्रविकास आणि गृहनिर्माण प्राधिकरण (म्हाडा)ने देखील समाजमाध्यमांवर झळकण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. नागरिकांना थेट सोशलमिडीयाच्या माध्यमातून म्हाडाशी संपर्क साधता येणार आहे.

म्हाडा ही महाराष्ट्र सरकारद्वारेशासित असलेली स्वायत्त संस्था आहे. म्हाडा हे देशातील सर्वात मोठे गृहनिर्माण प्राधिकरण असून राज्यात नऊ लाखांहून अधिक गृहनिर्माण युनिट आहेत. राज्यातील नागरिकांना परवडणाऱ्या दारात घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची स्थापन झाली. हे पाहता म्हाडाने जाहीर केलेले निर्णय, मोहिमा, घोषणा, गृहनिर्माण योजनांची माहिती घेणे हा नागरिकांचा अधिकार आहे. हे पाहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या एकमेव उद्देशाने जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि म्हाडासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीच्या नियुक्तीसाठी म्हाडाने तब्बल ५० लाखांचे टेंडर जारी केले होते. नियुक्त करण्यात आलेल्या म्हाडाच्या विविध योजना, लॉटरी या संदर्भातील लेटेस्ट अपडेट्स माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय म्हाडाशी संवाद साधणे एकदम सोपे होईल.

जनसंपर्क विभागाची ही कामे एजन्सी करणार

- म्हाडासाठी ब्रॅण्डिंग आणि जनसंपर्क मोहीम आखणे
- समाजमाध्यमांवरील रीलस्टारना घेऊन म्हाडा प्रकल्पांची प्रसिद्धी करणे
- लेख, ऑप एड लेख, नेतृत्वशील व्यक्तींच्या प्रतिक्रिया लिखाण
- जनसंपर्क अहवाल, समाजमाध्यमाचा परीक्षण आणि आकडेवारीसह अहवाल सादर करणे
- व्हलॉग आणि पॉडकास्टसाठी विषयांची तयारी
Powered By Sangraha 9.0